Mumbai School Nutrition Scheme pudhari photo
मुंबई

Mumbai School Nutrition Scheme : शालेय पोषण आहारातील दोषींवर कारवाईची मागणी

विरोधी पक्षनेत्‍याची प्रशासनावर टीका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या शालेय पोषण आहारासाठी पुरविण्यात येणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

शालेय पोषण आहारातील धान्याच्या गुणवत्तेपासून ते पुरवठा व्यवस्थेतील कथित अनियमिततेपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

शालेय पोषण आहारासाठी पुरविण्यात येणाऱ्या तांदळाच्या नमुन्यात प्लास्टिकसदृश दिसणारे बारीक कण आढळत असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. तांदळामध्ये गहू, तुटलेले तांदळाचे दाणे आणि खाण्यायोग्य नसल्याचा संशय असलेले धान्य आढळत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

कारवाईच्या वेळी अनेकदा वाहनचालक किंवा क्लिनर यांच्यावरच जबाबदारी निश्चित केली जाते; मात्र संबंधित गोदामांचे मालक, पुरवठादार आणि संपूर्ण वितरण साखळीतील जबाबदार व्यक्तींवर कारवाई होते का, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली.

तडजोड खपवून न घेण्याचा इशारा

लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. पाच ते बारा वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय असल्याने प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT