BMC Manhole Contract Pudhari
मुंबई

BMC Manhole Contract: मुंबईत तुटलेली, गायब झालेली मॅनहोलची झाकणे बदलणार; पालिकेचा १.१० कोटींचा प्रस्ताव

१८० चौरस मीटरपैकी ३८ चौरस मीटरचे काम अपूर्ण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरील तुटलेली आणि गायब झालेली मॅनहोलची झाकणे बदलण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असताना, पावसाळा संपल्यानंतर आता झाकणे बदलण्यासाठी मुंबई महापालिकेला नव्याने कंत्राट काढावे लागत आहे.

पालिका ‘ए’ ते ‘जी/उत्तर’ विभागातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या मॅनहोलची झाकणे बदलण्यासाठी तब्बल १ कोटी १० लाख ४९ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीच्या कंत्राटांतर्गत १८० चौरस मीटरपैकी १४२ चौरस मीटर क्षेत्रातील काम पूर्ण झाले असून, उर्वरित ३८ चौरस मीटरचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे वारंवार कंत्राटे देऊनही मॅनहोलच्या झाकणांचा प्रश्न सुटत नसल्याचे चित्र आहे. संबंधित विभागांमध्ये अनेक ठिकाणी मॅनहोलची झाकणे तुटलेली किंवा गायब झालेली आहेत.

काही ठिकाणी मॅनहोलच्या फ्रेम सुस्थितीत असल्या तरी झाकणांचे आकार प्रमाणित नसल्याने नवीन झाकणे बसविण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून प्रत्यक्ष जागेवर मोजमाप घेऊन त्यानुसार एमएसची आयताकृती झाकणे तयार करून बसविण्यात येणार आहेत. ही झाकणे साखळी आणि कुलूपबंद यंत्रणेसह बसविण्याचे नियोजन आहे.

या कामासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही निविदा प्रक्रियेला केवळ दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी मे. बेलटेक इंजिनिअर्स या कंपनीने अंदाजित खर्चापेक्षा १२.६५ टक्के कमी दराने निविदा सादर केली आहे. या कंपनीची कंत्राटदार म्हणून शिफारस करण्यात आली आहे.

पुढील २४ महिन्यांत ४०० चौरस मीटर क्षेत्रातील मॅनहोलची झाकणे बदलण्यात येणार आहेत. कामाची निकड लक्षात घेऊन प्रशासनाने ५० लाख रुपयांपर्यंतच्या कामाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. उर्वरित कंत्राटासाठी आता स्थायी समितीची मंजुरी मागण्यात आली आहे.

एका झाकणाची किंमत २५,७६९ रुपये :-

संबंधित कंत्राटदारांकडून महापालिकेला देण्यात येणाऱ्या एका झाकणाची किंमत २५ हजार ७६९ रुपये आहे. अशाप्रकारे तब्बल १ कोटी १० लाख ४९ रुपये पैसे खर्च करण्यात येणार आहे.

झाकणे गायब होतातच कशी?

मॅनहोलची झाकणे बदलण्यासाठी वारंवार कंत्राटे काढली जात असून लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. तरीही झाकणे तुटणे किंवा गायब होण्याचे प्रकार थांबत नसल्याने महापालिकेच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झाकणांची चोरी रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, नियमित तपासणी कोण करणार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असे सवाल उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT