मुंबई: तीन दिवसापूर्वी आगमन मिरवणुकीत अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती कोसळून झालेल्या जीवघेण्या अपघाताची गंभीर दखल मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली आहे. यापुढे उंच गणेश मूर्तींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक करण्याचा महापालिकेचा विचार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑडिट प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच गणेश कारखान्यातून मूर्ती बाहेर काढण्यास परवानगी दिली जाणार आहे.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गगनाला भिडणाऱ्या उंच मुर्त्या पाहिल्यावर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. ४५ फुटापर्यंत म्हणजे सरासरी तीन मजल्याच्या इमारती एवढ्या मुर्त्या मूर्तिकारांकडून घडवल्या जातात. अनेक गणेश मूर्ती या अधांतरी असल्याने या मुर्त्यांचा तोल कधीही जाण्याची भीती असते.
मूर्तिकार आपल्या परीने मूर्ती बनवतो. परंतु ही मूर्ती कार्यशाळेतून गणेश उत्सव मंडपापर्यंत छोट्या ट्रॉलीवरून नेण्यात येते. त्यामुळे मूर्ती अक्षरश: रस्त्यावरून जाताना हलताना दिसून येतात. मूर्तिकाराने मूर्ती नेण्यास नकार दिलेला असतानाही भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मूर्ती नेण्याचा हट्ट धरला.
त्यामुळे दुर्घटना होऊन दोघांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता महापालिका गणेशाेत्सव मंडळांना परवानगी देताना मुर्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नवीन अट टाकण्याचा विचार करीत आहे.
या अटीचा निर्णय घेण्यापूर्वी महापालिका सार्वजनिक मंडळांशी संवाद साधून या अटीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मूर्तिकाराने मूर्ती बनवल्यानंतर ती वाहून नेण्यासाठी सक्षम आहे का ? याचे तज्ञ्ज स्ट्रक्चरल ऑडिटरमार्फत ऑडिट करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतरच ती मूर्तीकाराच्या मंडपातून बाहेर काढण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे भुलेश्वर राजासारखे जीव घेणे अपघात टळू शकतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.