मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत आंतररुग्ण विभागात दररोज 14 हजारांपेक्षा अधिक रुग्ण दाखल होतात. मात्र, या रुग्णांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे फक्त 62 रुग्णवाहिका असून त्या अपुर्या पडत आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णवाहिकेसाठी पाच ते दहा हजारांपर्यंतचा भूर्दंड सहन करावा लागत आहे.
दरम्यान, रुग्णांची ही गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपनगरीय रुग्णालयांसाठी 20 साध्या तर 5 कार्डियाक रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दररोजची रुग्णसंख्या पाहता ही संख्याही कमी पडणार आहे.
मुंबई पालिकेच्या केईएम, नायर, सायन, कुपर या प्रमुख हॉस्पिटलसह 16 उपनगरीय व 6 विशेष हॉस्पिटल, 30 प्रसूतीगृह आहेत. या रुग्णालयांमध्ये मुंबई शहरातीलच नाही तर आजूबाजूच्या शहरातून व देशभराततून रुग्ण उपचारासाठी येतात. आंतररुग्ण विभागात 12,462 खाटा असल्या तरी, प्रत्यक्षात उपचार घेणार्यांची दैनंदिन संख्या ही 14 हजारांवर आहे. तर बाह्य रुग्ण विभागात किमान 50 ते 60 हजारांवर रुग्ण दररोज विविध तपासण्यासह उपचार घेतात. त्यामुळे पालिका हॉस्पिटलवर रुग्णसेवेचा भार प्रचंड आहे. यात गरीब रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना औषधांसह डॉक्टर, नर्सेस, खाटांची उपलब्धता मोफत मिळते. काही चाचण्याही मोफत व शस्त्रक्रियाही मोफत होतात.
सध्या सर्व हॉस्पिटलमध्ये 62 रुग्णवाहिका आहेत. यातील काही रुग्णवाहिका या जुन्या झाल्यामुळे त्यात वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना जेव्हा गरज असते तेव्हा महापालिकेची रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या शेकडो तक्रारी आहेत. उपनगरीय रुग्णालये व प्रसुतीगृहामध्ये ही गैरसोय मोठी आहे. येथे 14 साध्या व तीन हृदयरोग (कार्डियाक) रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. रुगणसंख्या उपलब्ध होत नसल्ीयाने खासगी रुग्णवाहिकेला 5 ते 6 हजार रुपये भाडे मोजावे लागत आहे.
ही गैरसोय पाहता मुंबई महापालिकेने उपनगरीय रुग्णालयांसाठी 20 साध्या व 5 कार्डियाक रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णसंख्या पाहता सरासरी 100 रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात 62 रुग्णवाहिका असून यात आता 25 रुग्णवाहिकांची भर पडणार आहे. तरीही अजून 15 ते 20 रुग्णवाहिकेची गरज आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातून बोलले जात आहे.
आपला दवाखान्यात अधिकची गैरसोय
मुंबईत 190 हदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असून दरवर्षी सरासरी 3 लाख 51 हजार रुग्ण उपचार घेतात. या दवाखान्यात एखादा रुग्ण अचानक गंभीर झाला तर त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी दवाखान्या बाहेर रुग्णवाहिका नसते. 20 ते 25 दवाखान्यांमध्ये एक रुग्णवाहिका असे प्रमाण आहे.
रुग्णवाहिकांच्या भाड्यापोटी पालिका मोजणार 16 कोटी
भाडेतत्त्वावर घेण्यात येणार्या रुग्णवाहिकेंसाठी येणार्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिका 16 कोटी 9 लाख 32 हजार रुपये मोजणार आहे.
पहिल्या वर्षासाठी प्रतिपाळी एका साध्या रुग्णवाहिकेचे भाडे 2763 रुपये असून कार्डियाक रुग्णवाहिकेचे भाडे 3,861 रुपये आहे. दुसर्या वर्षासाठी साध्या रुग्णवाहिकेचे भाडे 3,069 रुपये तर कार्डियाक रुग्णवाहिकेचे भाडे 4,149 रुपये आहे.