मुंबई: मुंबई महानगरपालिकेतर्फे शहरात २ लाख ४४ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुदत ठेवी मोडून या प्रकल्पांचा खर्च भागवला जात आहे. त्यामुळे पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुमारे ८१ हजार कोटी रुपयांवर पोहोचला असला तरी, पालिकेने हाती घेतलेल्या विकासकामांसाठी तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवी मोडण्यात येत आहेत.
मुंबई कोस्टल रोड वर्सोवा ते दहिसर या प्रकल्पासाठी तब्बल ३३ हजार ९१० कोटी, तर मुंबई मलनि:सारण प्रकल्पासाठी सुमारे २२ हजार ९१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय अन्य प्रकल्पांसाठीही करोडो रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे एवढे पैसे आणायचे कुठून,असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे. यासाठी सुमारे १४ हजार ३९० कोटी रुपयांच्या पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प गुंडाळण्याची शक्यता आहे.
पालिकेने गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला असून खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी करण्याच्या प्रकल्पाचे कामही सुरू आहे. त्यामुळे या दोन प्रकल्पांसाठी सुमारे २० हजार कोटी रुपये लागणार आहेत.
त्यामुळे पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पासाठी निधीची मोठी कमतरता भासू शकते. पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असून या प्रकल्पातून मुंबईकरांना ८६५ दशलक्ष लिटर पाणी मिळणार होते.
गारगाई व खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पापेक्षा जास्त पाणी या प्रकल्पातून मिळणार आहे; परंतु गारगाई व गोराई येथे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यामुळे पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पाला सध्या चालना देणे शक्य नसल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
जव्हारमध्ये साकारणार होता प्रकल्प
पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प जव्हार तालुक्यामधील खिडसे गावानजीक विकसित करण्यात येणार होता. या प्रकल्पांतर्गत प्राथमिक अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात आली होती. या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रांमुळे बाधित होणार्या खासगी व शासकीय जमिनी संपादन करण्यात येणार होत्या. विकास नियोजन आराखड्यांतर्गत आरक्षित असलेले भूखंड खरेदी करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार पालिकेला प्राप्त झाल्या आहेत.
दमनगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पही कागदावरच
मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने शिफारस केल्यानुसार दमनगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत गुजरात सरकारशी प्राथमिक चर्चाही झाली होती; परंतु गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच आहे. या प्रकल्पातून १ हजार ५८६ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे.