मुंबई : प्रभाग क्रमांक चार, बोरिवली पूर्वमधून एका सामान्य डबेवाल्याचा मुलगा मंगेश दत्ताराम पांगारे यांनी विजयाचा गुलाल उधळला. मंगेश पांगारे विजयी होताच डबेवाल्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. या प्रभागात शिवसेना उबाठाचे राजू मुल्ला आणि काँग्रेस पक्षाचे राहुल विश्वकर्मा हे उमेदवार रिंगणात होते. मात्र शिवसेनेच्या मंगेश दत्ताराम पांगारे यांनी त्यांना धूळ चारली.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 194 मधून विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा 603 मतांनी पराभव केला.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांची मुलगी पूजा महाडेश्वर यांनी प्रभाग क्रमांक 87 मधून विजय मिळवला आहे.
शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोणा रावत यांनी दीप्ती वायकर यांचा पराभव केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते मनोज जामसूतकर यांची मुलगी सोनम जामसूतकर यांनी प्रभाग क्रमांक 210 मधून विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे बंधू कप्तान मलिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रभाग क्रमांक 165 मध्ये काँग्रेसचे आशरफ आझमी विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी गायकवाड यांचा पराभव केला.
अरुण गवळी यांची मुलगी आणि अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता गवळी यांचा पराभव झाला आहे. भायखळामधून भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.
धारावी भागातील प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे या 1450 मतांनी निवडून आल्या आहेत. आशा काळे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आहेत.
शिवसेना उबाठाचे नेते विनोद घोसाळकर यांची सून आणि भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.