मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालांनी यंदा राज्याच्या राजकीय समीकरणांना कलाटणी दिली आहे. विशेषतः मानखुर्द-शिवाजी नगर आणि चेंबूर परिसरात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांच्यातील तीव्र राजकीय संघर्ष 'एमआयएम'च्या (AIMIM) पथ्यावर पडला आहे. या दोन बड्या नेत्यांच्या वादात मतदारांचे झालेले विभाजन असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षासाठी फायदेशीर ठरले असून, एमआयएमने मुंबईत ४ जागांवर विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मुंबईच्या विविध प्रभागांत एमआयएमच्या उमेदवारांनी वर्चस्व गाजवत पक्षासाठी मोठा विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
प्रभाग क्रमांक १३६ : मानखुर्द-शिवाजी नगर जवळील या प्रभागातून एमआयएमचे जमीर कुरैशी यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. त्यांना एकूण १४,९२१ मते मिळाली असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा ९,९२३ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
प्रभाग क्रमांक १३७ : याच परिसरातील दुसऱ्या प्रभागात एमआयएमचे समीर रमजान पटेल विजयी झाले. त्यांनी ९,४३६ मते मिळवत ४,५६८ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली.
प्रभाग क्रमांक १४५ : चेंबूरमधील चीता कॅम्प परिसरात एमआयएमच्या महिला उमेदवार खैरनुसा अकबर हुसैन यांनी आपली आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रभाग क्रमांक १३४ : येथून एमआयएमच्या मेहजबीन अतीक अहमद यांनी चौथ्या जागेवर विजय मिळवून दिला.