मुंबई : राजेश सावंत
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाले असून यात अनेक माजी दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांचे कुठे पुनर्वसन करता येईल यासाठी राजकीय पक्षांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यासाठी त्या प्रभागातील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यात येणार आहे.
प्रभाग आरक्षणामध्ये 161 माजी नगरसेवकांनी आपले प्रभाग गमावले आहेत. यात अभ्यासू, प्रतिष्ठित व दांडगा जनसंपर्क असलेल्या ज्येष्ठ माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यामुळे अगामी महानगरपालिकेमध्ये अशा नगरसेवकांची सर्वच पक्षांना आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिकेचे कामकाज पूर्णपणे नव्या नगरसेवकांकडे सोपवणे कोणत्याच पक्षाला फायदेशीर ठरणारे नाही.
त्यामुळे काही ज्येष्ठ माजी नगरसेवकांना पुन्हा महापालिकेत पाठवण्यासाठी राजकीय पक्षांची चाचपणी सुरू झाली आहे; परंतु अन्य प्रभागात त्यांचे राजकीय पुनर्वसन करताना, गेल्या कित्येक वर्षांपासून त्या प्रभागात काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. अन्यथा कार्यकर्त्यांची नाराजी ओढावून घ्यावी लागेल.
खुल्या प्रवर्गात महिलांनाही संधी
खुल्या प्रवर्गात सक्षम व प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाला शह देणारा उमेदवार नसेल तर, अशा खुल्या प्रवर्गात एखाद्या महिला माजी नगरसेवक अथवा पदाधिकाऱ्याला उमेदवारी मिळू शकते. मग त्या प्रभागात पदाधिकाऱ्यांचा विरोध असला तरी राजकीय पक्षांना तसा निर्णय घेणे भाग पडणार आहे. यातून मुंबई महानगरपालिकेतील महिला नगरसेवकांची संख्याही वाढणार आहे.