Mumbai BMC Election BJP
मुंबई : मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील ८ दिवस मुंबई सोडून कुठेही बाहेर न जाण्याचे कडक आदेश दिले आहेत.
मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी साधारण ८ ते १० दिवसांचा वेळ लागू शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु येत्या दोन दिवसांत हे आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच भाजप सत्ता स्थापनेचा अधिकृत दावा करणार आहे.
एकीकडे एकनाथ शिंदे यांनीदेखील महापौर पदावर दावा केला असताना, दुसरीकडे भाजप स्वतःचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपले नगरसेवक एकत्र राहावेत, या हेतूने पक्ष नेतृत्वाने त्यांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेच्या निकालानंतर मुंबईसह कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकेत मित्रपक्ष भाजप- शिवसेना युतीमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबईत भाजपपेक्षा कमी जागा जिंकल्या असल्या तरी आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याने शिंदेंच्या शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करण्यात आली आहे. दगाफटका नको म्हणून शिंदेंनी आपले नगरसेवक ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांचे नगरसेवक गळाला लावून आपली ताकद वाढविण्याचे प्रयत्नदेखील एकनाथ शिंदेंनी ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, महापौर निवडीसाठी आरक्षण सोडतीनंतरच वेग येण्याची शक्यता आहे.