BMC Ward Reservation
मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण होणार नसल्याची चर्चा रंगली असली तरी, नोव्हेंबरमध्ये प्रभाग आरक्षण काढण्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे पुन्हा नगरसेवक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या माजी नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांची पुनर्रचना अंतिम टप्प्यात असून ६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागातील मतदार यादी निश्चित करण्याचे काम हाती घेऊन हे काम महिन्याभरात पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात २२७ प्रभागांचे आरक्षण सोडत काढली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत जे प्रभाग खुल्या प्रवर्गात होते. तेथे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. मग ते आरक्षण महिला खुल्या वर्गासाठीही असू शकते. हे आरक्षण काढण्यासाठी २०१७ मधील आरक्षणाचा अभ्यास करण्यात येत आहे.
मुंबईतील २२७ प्रभागांपैकी १७ प्रभाग अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी सुरुवातीपासून राखीव आहेत. त्यामुळे उर्वरित २१० प्रभागातून ओबीसी आरक्षणाचे प्रभाग निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानुसार ओबीसीसाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये २७ टक्के आरक्षणानुसार ६१ प्रभाग राखीव राहणार आहेत. यात ५० टक्के ओबीसी महिला आरक्षण असणार आहे. उर्वरित १४९ प्रभाग खुल्या प्रवर्गात राहणार असून यात ५० टक्के महिला आरक्षण राहणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाल्यानंतर प्रभाग आरक्षण लॉटरी काढण्यात आली होती. या सोडतीमध्ये २३६ पैकी १२६ प्रभाग आरक्षणामध्ये गेले होते. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ११० प्रभागावर समाधान मानावे लागणार होते. या आरक्षणात अनेक दिग्गजांचे पत्तेही कट झाले होते. परंतु हे आरक्षण रद्द झाल्यामुळे पुन्हा एकदा महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी संधी मिळणार आहे.