मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील जागांबाबत आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याने, आता भारतीय जनता पक्षाने एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे समजते. ज्या जागांवर अद्याप सहमती झालेली नाही, तिथे चर्चा करत न बसता भाजप आपल्या उमेदवारांना परस्पर 'एबी फॉर्म' (AB Form) देण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. याच बळावर त्यांनी मुंबईत १२५ जागांची मागणी लावून धरली आहे. मात्र, भाजपच्या मते ज्या जागांवर शिंदे गटाची ताकद नाही, तिथे जागा सोडल्यास महायुतीचे नुकसान होऊ शकते. 'ठाकरे ब्रँड'ला रोखण्यासाठी मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकणे आवश्यक असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
सोमवारी (दि.२२) रात्री उशिरा मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा'वर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खालील मुद्द्यांवर खलबते झाल्याचे समजते. मध्यस्थीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांना देखील तातडीने बोलावून घेण्यात आले. मात्र या विषयात कोणताही तोडगा न निघाल्यास रात्री उशिरा झालेल्या बैठकीत उमेदवार घोषित करायचे आणि अन्य जागांवरील घोषणा न करता परस्पर एबी फॉर्म द्यायचे असा निर्णय झाला असल्याचही समजते.
सहयोगी पक्षाला थेट न दुखावता, पण जागांवर तडजोड न करता भाजपने घेतलेला हा 'एबी फॉर्म'चा निर्णय मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवणारा ठरू शकतो. यामुळे काही जागांवर महायुतीमध्ये 'मैत्रीपूर्ण' लढत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.