BMC  pudhari photo
मुंबई

Mumbai BMC Face Reading: महापालिका नगरसेवकांना आता फेस रीडिंगद्वारे सभागृहात प्रवेश आणि हजेरी!

मुंबईकरांना घरबसल्या कळणार लोकप्रतिनिधींची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आगामी कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून आता नगरसेवकांच्या उपस्थितीवर तंत्रज्ञानाची नजर राहणार आहे. महापालिका सभागृहात नगरसेवकांना प्रवेश आणि हजेरीसाठी फेस रिडिंग अर्थात चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

त्यामुळे नगरसेवकांच्या उपस्थितीची माहिती मुंबईकरांना घरबसल्या कळणार आहे. आणि सभागृहातील नगरसेवकही सुरक्षित राहतील, याकरिता फेस रिडिंगची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत सध्या जनतेमधून निवडून आलेले २२२ आणि स्वीकृत १० नगरसेवक आहेत. असे एकूण २३२ नगरसेवक महापालिकेच्या सभागृहातमध्ये बसतात. या सर्व नगरसेवकांना आता सभागृहात प्रवेश करण्यासाठी फेस रिडिंग करावी लागणार आहे.

तसा प्रस्ताव प्रशासनाकडून लवकरच सादर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कामकाजात नगरसेवकांची उपस्थिती हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे.

अनेकदा बैठकीला उपस्थिती लावून प्रत्यक्ष कामकाजात सहभागी न होणे, बैठका सुरू झाल्यानंतर किंवा संपण्यापूर्वी सभागृहातून बाहेर पडणे, तसेच नागरिकांच्या प्रश्नांवरील चर्चेला गैरहजर राहणे, अशा तक्रारी होत असतात.

या पार्श्वभूमीवर फेस रिडिंग प्रणालीमुळे हजेरीची नोंद आणि नगरसेवकांची प्रत्यक्ष उपस्थिती ही त्या -त्या राजकीय पक्षातील वरिष्ठांना आणि विभागातील नागरिकांना सोयीचे ठरेल.

या प्रणालीमध्ये बैठकीच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांद्वारे नगरसेवकाचा चेहरा ओळखला जाईल. त्यानुसार संबंधित नगरसेवक बैठकीला उपस्थित असल्याची डिजिटल नोंद केली जाऊ शकते. भविष्यात ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याचा पर्यायही विचाराधीन राहू शकतो.

यामुळे कोणत्या बैठकीला कोणता नगरसेवक उपस्थित होता, किती वेळ उपस्थित राहिला आणि बैठकीतील सहभाग किती होता, याबाबत नागरिकांना अधिक स्पष्ट माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र, फेस रिडिंग प्रणाली नेमकी कोणत्या बैठकींसाठी, कोणत्या निकषांवर आणि नागरिकांसाठी कोणती माहिती उपलब्ध करून देणार, याबाबतचे अंतिम नियम महापालिकेकडून लवकरच स्पष्ट होतील.

सभागृहात बसलेल्या नगरसेवकांची सुरक्षा आणि कामकाज मुंबईकरांच्यादृष्टीने अंत्यत महत्वाचे आहे. यामुळे भविष्यात सभागृहात प्रत्येक नगरसेवकांची फेस रिडिंगद्वारे प्रवेश आणि हजेरी प्रणाली कार्यान्वित केल्यास, स्वागतार्ह आहे.
- रितू तावडे, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT