Rustomjee Crown Illegal Construction Pudhari
मुंबई

Rustomjee Crown Illegal Construction: ‘रूस्तमजी क्राऊन’च्या आलिशान फ्लॅट्‌समधील अतिक्रमणावर हातोडा

सलग दुसऱ्या दिवशी प्रभादेवीमध्ये महापालिकेची सहा फ्लॅटवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रभादेवीच्या राजकीय वरदस्त असलेल्या रुस्तुमजी क्राऊन या आलिशान इमारतीमधील अनधिकृत बांधकामावर अखेर सोमवारपासून कारवाई सुरू झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही इमारतीतील सहाव्या मजल्यांवरील सहा फ्लॅटमध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. तर चार फ्लॅटधारकांनी स्वतःहून घरातील अनधिकृत बांधकाम तोडले.

प्रभादेवीतील गोखले रोड साऊथ परिसरात असलेल्या अलिशान रुस्तमजी क्राउनच्या ‘ए’ आणि ‘बी’ या दोन विंगमध्ये ३०० पेक्षा जास्त फ्लॅट आहेत. त्यापैकी १३८ फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून बदल आले आहेत.

याबाबत तक्रार आल्यानंतर मुंबई महापालिकेने या इमारतीची पाहणी केली होती. त्यानुसार मूळ बांधकामात बदल करणाऱ्या फ्लॅटधारकांना महापालिकेने नोटीस बजावली होती.

या नोटीसनंतर काही फ्लॅटधारकांना अनधिकृत बांधकाम तोडण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार चार फ्लॅटधारकांनी स्वतःहून आपले बांधकाम तोडले. मात्र अन्य फ्लॅटधारकांनी बांधकाम तोडण्याकडे दुर्लक्ष केले.

महापालिकेने पुन्हा नोटीस बजावून बांधकाम तोडण्याचा इशारा दिला. तरीही कोणी ऐकण्यास तयार नसल्यामुळे अखेर सोमवारपासून महापालिकेने स्वतः कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी चार फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.

यावेळी काहींनी विरोध करण्यात आल्यामुळे मंगळवारी कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई सुरू केली.

९ फ्लॅट मधील अनधिकृत बांधकामे व फेरबदलांविरोधात कारवाई पूर्ण करण्यात आली. दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात आल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

अतिक्रमण असतानाही भोगवटा प्रमाणपत्र

टॉवर ‘ए’मध्ये अतिक्रमण असतानाही सप्टेंबर २०२४ मध्ये टॉवर ‘बी’ला अंशतः भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणांमध्ये तक्रारदार संतोष दौंडकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि अंमलबजावणी संचालनालयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रकल्पाशी संबंधित २५० कोटी रुपयापेक्षा जास्त आर्थिक व्यवहारांमध्ये अपारदर्शक निधीचा वापर झाल्याची शक्यता दौंडकर यांनी आपल्या तक्रारीमध्ये व्यक्त केली आहे.

इमारतीची रचना

रुस्तमजी क्राऊन ही इमारत ३ तळघर, तळमजला व त्यावर ६३ मजले अशा स्वरूपाची आहे. इमारतीतील १ ते १२ मजले वाहनतळासाठी, १० वा व ११ वा मजला फिटनेस सेंटरसाठी, १३ वा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी, तर १४ ते ६३ मजले निवासी वापरासाठी आहेत. निवासी भागात ए बी आणि सी अशा तीन विंगचा समावेश आहे. ए आणि बी विंगला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, दोन्ही विंगमध्ये प्रत्येकी १८६ फ्लॅट आहेत.

राजकीय नेते,मंत्री व प्रतिष्ठित व्यक्तींमुळे कारवाई चर्चेत

या कारवाईच्या कक्षेत मंत्री संजय राठोड, त्‍यांच्या पत्‍नी शीतल राठोड, शिवसेनेचे नेते माजी आमदार व सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, त्‍यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांच्या फ्लॅटचा समावेश आहे. तसेच याच टॉवरमध्ये दरमहा ४ लाख २० हजार रुपये भाड्याने राहणारे माजी मंत्री दीपक केसरकर राहात असलेल्या फ्लॅटवरही कारवाई होणार असल्याचे समजते.

कारवाईसाठी मोठे मनुष्यबळ

या कारवाईसाठी महापालिकेच्या वतीने १५ कामगार, २ मुकादम, ४ अभियंते आणि ८ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या इमारतीत राजकीय नेतेमंडळी असल्याने गोंधळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून बंदोबस्त वाढविला होता.

कॉमन लॉबी, पॅसेजच्या जागेवर फ्लॅटधारकांचे अतिक्रमण

फ्लॅटधारकांनी कॉमन लॉबी आणि पॅसेजच्या जागेवर अतिक्रमण करून सुमारे ४५० ते ५०० चौरस फूट अतिरिक्त क्षेत्र आपल्या फ्लॅटमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या फ्लॅटचा उपयुक्त कार्पेट एरिया वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

काही फ्लॅटमध्ये सामाईक लॉबीचा भाग लाकडी साहित्य व हलक्या वजनाच्या सिपोरेक्स विटांचा वापर करून अनधिकृतरीत्या बंदिस्त करण्यात आल्याचे आढळले. किचन डक्टचा भाग एम.एस. प्लेटच्या सहाय्याने बंदिस्त करून तो स्वयंपाकघराच्या क्षेत्रात अनधिकृतरीत्या समाविष्ट करण्यात आला होता. काही ठिकाणी व्हेंटिलेशन शाफ्टचा भाग एम.एस. प्लेटने बंदिस्त करून सदनिकेच्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. आणि त्याचा वापर स्टोअर रूम म्हणून केला जात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT