मुंबई ः चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ब्लेडने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात त्या दोघीही जखमी झाल्या असून त्यांच्यावर शतब्दी रुग्णालयात प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपी पतीला अटक केली आहे. त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी पत्नीसह चौदा वर्षांच्या मुलीसोबत दहिसर येथे राहतो. तो पेस्ट कंट्रोलचे काम करतो तर पत्नी एका खाजगी कंपनीत डायमंड सॉर्टर म्हणून कामाला आहे. मुलगी याच परिसरातील एका शाळेत आठवीत शिकते. आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिने कोणाला भेटायचे नाही, कोणाशी गप्पा मारायचे नाही, मोबाईल बोलायचे नाही म्हणून तो तिला सतत दारुच्या नशेत शिवीगाळ करुन मारहाण करत होता.
परिणामीं तिने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ती रविवारी वकिलाला भेटायला गेली होती. रात्री आठ वाजता ती घरी येताच त्याने तिच्याशी वाद घालून शिवीगाळ केली होती. रागाच्या भरात तिने घर विकून मुलीला घेऊन निघून जाण्याची धमकी दिली होती. यावेळी त्याने तिला तसे केल्यास तिच्यासह तिच्या मुलीला संपवून स्वत: जीवन संपवण्याची धमकी दिली. रात्री उशिरा जेवल्यानंतर ती मुलीसोबत पोटमाळ्यावर झोपण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने दोघींच्या गळ्यावर, पोटावर, मानेवार ब्लेडने वार केलेे.