आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मुंबई भाजपात संघटनात्मक बदलांचे वारे वाहू लागले आहेत. नव्याने पक्षात येणाऱ्यांना संधी देतानाच अधिकाधिक युवांना सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी बनविण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यासाठी विधानसभा क्षेत्रात एकाच्या जागी तीन-तीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, त्यासाठी कमाल वय ४५ असा निकष ठरविल्याने अनेक मतदारसंघांत जुन्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर मुंबई भाजपमधील हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सोमवारी सर्व आमदार, प्रमुख नेत्यांच्या तातडीच्या बैठकीनंतर मंगळवारीही प्रदेश कार्यालयात संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचे समजते. दुसरीकडे पक्षांतर्गत निवडणुकांचा नवा फॉर्म्युला लागू झाल्याने मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत घुसळण सुरू आहे. संघटनात्मक फेरबदल करत अधिकारांचे विकेंद्रीकरणाचे प्रयत्न भाजपाने हाती घेतले आहेत. १०० बूथमागे एक मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईतील ३६ विधानसभांकरिता १०८ मंडल अध्यक्ष नेमले जाणार आहेत. यापूर्वी एका विधानसभा क्षेत्रासाठी केवळ एकच अध्यक्ष दिला जात होता. मात्र, आता तिघांना संधी मिळणार आहे. पन्नाप्रमुख, बूथप्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष अशी रचना मुंबई भाजपमध्ये आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा ही केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी असल्याने अन्य पक्षांतून भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाले आहे. या सर्वांना सामावून घेण्यासाठी नवी रचना अवलंबली जात आहे.
मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघात साधारण बाराशे ते दीडहजार बूथ असतात. त्यातील १०० बूथमागे एक मंडल अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे एकेका विधानसभेत दोन ते तीन मंडल अध्यक्षांना संधी मिळणार आहे. मात्र, या मंडल अध्यक्षांची नियुक्ती करताना ४५ वर्षांखालील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण आहे. येत्या १५ मेपर्यंत मुंबई अध्यक्ष नेमायचा असल्याने, त्याआधी मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
मंडल अध्यक्ष निवडण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निरीक्षक पाठविले गेले. तिथे संबंधितांकडून बंद पाकिटात एका जागेसाठी तीन नावांची शिफारस घेतली गेली. लवकरात लवकर स्थानिक नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले. दुसरीकडे वयाची अट सांभाळतानाच संबंधितांची क्षमताही विचारात घ्यावी लागणार आहे. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणारे आता सत्ता आल्यावर बेदखल होणार नाहीत, याचाही विचार करावा लागणार असल्याचे या नेत्याने सांगितले.