मुंबई : मुंबईत जन्मसंख्या दर 3.80 टक्क्याने घटला आहे. 2014 या वर्षात जन्मदर 13.83 इतका होता. 2023 या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला असता हा दर 10.03 टक्के इतका होता. त्यामुळे मुंबईत वार्षिक जन्मसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचे स्पष्ट होते.
मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सर्व्हेनुसार मुंबई शहरात जन्मदर कमी होताना दिसून येत आहे. मुंबई शहर व उपनगरांत दर दोन वर्षांनी जन्माला येणार्या बालकांची नोंद करण्यात येते. मुंबई शहर व उपनगरांत 2014 मध्ये 1 लाख 74 हजार 902 बालकांचा जन्म झाला. यात सर्वाधिक सुमारे 73 हजार 316 बालके पश्चिम उपनगरांत जन्माला आली.
हा दर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 13.05 टक्के इतका होता. शहर व पूर्व उपनगरांत 2014 मध्ये पश्चिम उपनगरांच्या तुलनेत कमी बालकांचा जन्म झाला असला तरी येथील लोकसंख्येच्या तुलनेत जन्मदर सरासरी 14 टक्केपेक्षा जास्त होता. यावर्षी पूर्व उपनगरांत 56 हजार 316 तर शहरात 45 हजार 270 बालकांचा जन्म झाला.
2023 मध्ये आलेल्या अहवालानुसार वर्षभरात 1 लाख 30 हजार 562 बालकांनी जन्म घेतला. म्हणजेच जन्मसंख्या सुमारे 44 हजाराने घटली. 2023 मध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक 52 हजार 536 बालकांनी जन्म घेतला तरी लोकसंख्येच्या तुलनेत जन्मदर 9.09 टक्के इतका होता. तर शहरांमध्ये 40 हजार 996 बालकांनी म्हणजेच पश्चिम उपनगराच्या तुलनेत 12 हजार बालके कमी असूनही जन्मदर 12.07 टक्के इतका होता. पूर्व उपनगरात 37 हजार सत्तावीस बालकांचा जन्म झाला, येथील जन्मसंख्या दर 9.24 टक्के इतका होता.
जन्मदर कमी होण्याची प्रमुख कारणे
शिक्षण व आरोग्य सेवांमधील प्रगती
कुटुंब नियोजन व गर्भनिरोधकांचा वापर
वाढता शैक्षणिक खर्च, अन्य संगोपनाचा खर्च
धावपळीच्या जीवनात मुलांच्या संगोपनाचा प्रश्न
नवरा बायको दोघेही नोकरीला
विवाह उशिरा करण्याची किंवा अविवाहित राहण्याची प्रवृत्ती
पालकत्वापेक्षा आपल्या करिअरला अधिक महत्त्व
शहरीकरणामुळे जीवनशैलीत बदल होतोय
महापालिकेकडून होणारे प्रबोधन
एकल कुटुंब पद्धत