भांडुपच्या एलबीएस मार्गावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला  Pudhari
मुंबई

Shiv Sena Protest Mumbai| भांडुपमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिंदे गटाचे आंदोलन

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर भांडुपमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Shinde Group Protest vs Sanjay Raut

भांडुप: शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर भांडुपमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. एका बाजूला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वर्धापनदिन साजरा करत असताना, दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि आंदोलनांचे सत्र सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी अन्य सहा खासदारांसह स्वतंत्र भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली भांडुप रेल्वे स्थानक परिसरात खासदार संजय दिना पाटील आणि संबंधित खासदारांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी भांडुपच्या एलबीएस मार्गावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

भांडुपचे शिंदे गटाचे आमदार अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांनी आक्रमक वक्तव्ये टाळावीत, अशी भूमिका मांडली. तसेच आम्हीही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक असल्याचे सांगत पक्षावरील आपली निष्ठा व्यक्त केली.

या आंदोलनात महिला व पुरुष शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांमुळे भांडुप परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT