मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस सानुग्रह अनुदान देण्याची मुंबई महापालिकेची तयारी आहे. मात्र हा बोनस किती द्यावा याबाबत अध्यापर्यंत आकडा निश्चित झालेला नाही. पुढील आठवड्यात याबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली निर्णय होण्याची शक्यता आहे.
पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे ३३ हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी बेस्ट कर्मचारी कामगार संघटनांची आहे. मागील वर्षीही पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला होता. मात्र यावेळी पालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस देण्यास पालिका प्रशासन अनुकूल नाही. बेस्ट उपक्रमाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी आर्थिक मदत करण्यात येते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणे देण्यासाठीही पालिकेकडून आर्थिक मदत करण्यात आली होती.
प्रकल्पांसाठी महापालिकेच्या ठेवी मोडल्या
सध्या महापालिकेमार्फत सुरू असलेले मोठे प्रकल्प यात कोस्टल रोडसह गोरेगाव मुलुंड लिंक रोड, सांडपाणी प्रक्रिया केंद्र समुद्राचे खारेपाणी गोडे करण्याचा प्रकल्प व अन्य प्रकल्पांसाठी येणाऱ्या काळात सुमारे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त निधीची आवश्यकता भासणार आहे. ही कामे विविध बँकांमध्ये असलेल्या मुदत ठेवी मोडून केली जात आहेत.
वेळ पडल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत महापालिकेत तिढा सुटला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने हा तिढा सोडवला जाण्याची शक्यता आहे. याबाबत कामगार संघटनाही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा निर्धार कामगार संघटनांकडून व्यक्त करण्यात आला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनस विषय पालिका वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
तिजोरीत निधीची कमतरता
बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त बोनस दिला जाईल, मात्र त्याचा आकडा अद्याप ठरलेला नाही. याबाबत लवकरच महापौरांच्या अध्यक्षतेखाली कामगार नेते, बेस्ट प्रशासन, पालिका प्रशासन यांच्यात संयुक्त चर्चा होऊन मार्ग काढण्यात येणार आहे. पालिकेच्या तिजोरीत सध्या निधीची कमतरता असल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस देणे शक्य नसल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.