मुंबई : बेस्ट परिवहनाने लांब पल्यासाठी काही ठिकाणी कंत्राटी बसेस सुरू केल्या आहेत. त्यापैकी डाका कंपनीच्या बसेस चक्क स्कूल बस कॅटेगरीच्या गाड्या आहेत. वजनदार प्रवाशांना या बसच्या सीटवर बसने सुद्धा अवघड असल्याचा आरोप 'आपली बेस्ट आपल्यासाठी' या प्रवासी संघटनेने केला आहे.
स्वतःचे चालक,वाहक नसल्याने बसची वारंवारता दोन ते अडीज तास इतकी खाली घसरली आहे. त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना आहे. या सर्व अडचणीसाठी अनेक वेळा विनंती करूनही बेस्ट महाव्यवस्थापक भेटीसाठी वेळ देत नसल्याचा आरोपही संघटनेने यावेळी केला.
बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात 'आपली बेस्ट आपल्यासाठी' संघटनेचे अध्यक्ष रुपेश शेलटकर, गौरव चिंदरकर, स्वप्नील गांवकर, कुणाल आक्रे, अर्थव नाईक, अमित पै यांनी बेस्टच्या सद्यस्थितीवर माध्यमांशी संवाद साधला. बेस्ट उपक्रमाकडे यापूर्वी ४ हजार ५०० बसेस होत्या. आज फक्त ३ हजार बसेस आहेत. त्यातही प्रत्यक्ष ९०० बसेस कार्यरत आहेत.
कंत्राटी बस अधिक असून बेस्टच्या स्वमालकीच्या फक्त २९९ बसेस उरल्या आहेत. त्यापैकी २५ टाटा हायब्रीड बसेस धारावी डेपोमध्ये गेल्या दोन वर्षांपासून उभ्या आहेत. या बसेसचे सुटे भाग उपलब्ध नाहीत. अशी कारणे सांगून त्या बसेस दोन वर्षांपासून धूळखात ठेवल्या असल्याचे संघटनेचे अध्यक्ष रुपेश शेलटकर यांनी सांगितले.
कोट्यावधी रुपये खर्च करून जवळपास बेस्टच्या १६ डेपोमध्ये सीएनजीचा सेटअप उभारला आहे. आज महानगरात ५४ लाख नोंदणीकृत वाहनांपैकी फक्त १ टक्के इलेक्ट्रिकल वाहने आहेत. मग बेस्ट ६० ते ७० लाखात मिळणार सीएनजी बस सोडून दीड ते तीन कोटींच्या इलेकट्रीक बसचा आग्रह बेस्टकडून सुरू आहे ? शिवाय लांब पल्यासाठी डाका कंपनीच्या स्कूल बस कॅटेगरीच्या गाड्या सुरू आहेत. याकडे आरटीओचे दुर्लक्ष कसे ? या मागे नक्की काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.