मुंबई : मुंबईची लाईफलाईन बेस्ट परिवहन सेवा सध्या विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. सेवेत बेस्टच्या स्वमालकीच्या फक्त ४१८ बसेस शिल्लक आहेत. कंत्राटदारांकडून बस पुरवल्या जात आहेत. मात्र त्या कमी पडत आहेत. त्यामुळे सेवेवर परिणाम झाला आहे. धावत्या मुंबईत प्रवाशांना वाट पहावी लागत असल्याने पर्यायी सेवेचा वापर मुंबईकर करीत आहेत. त्यामुळे प्रवासी संख्याही घटली आहे.
सध्या असलेल्या ४१८ स्वमालकीच्या बसेसमध्ये २०६ सिंगल डेकर एसी, १८७ मिडी नॉन एसी व २५ हायब्रीड एसी बसेसचा समावेश आहे. बेस्टकडे प्रवासी संख्येच्या तुलनेत आवश्यक बस उपलब्ध नाहीत. कंत्राटदारांकडून वेळेत बस न पुरवल्याची तक्रारही प्रवाशांकडून होत आहे. १२ महिन्यांत २१०० बस पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात फक्त ६६५ बस मिळाल्या. त्यामुळे बेस्ट सेवा कोलमडत चालली आहे.
प्रवासी संख्येत घट
बस कमी असल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचा थेट परिणाम प्रवासी संख्येवर झाला आहे. २०१३-१४ ते २०२२-२३ या दहा वर्षांत तब्बल १२.५ लाख प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवली आहे. दैनंदिन प्रवासी संख्या ३४ लाखांवरून २२ लाखांवर घसरली आहे.