मुंबई : भांडुप पश्चिमेला बेस्टची बस मागे घेत असताना सुमारे 20 ते 25 पादचार्यांना बसने चिरडले. यात 4 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. जखमी प्रवाशांना तातडीने पालिका व खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यात काहींची प्रकृती गंभीर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भांडुप पश्चिमेकडील स्टेशन रोड येथील बसथांब्यावर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास बेस्टची बस वळण घेण्यासाठी मागे येत असताना 20 ते 25 नागरिकांना चिरडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यात 15 पेक्षा जास्त नागरिक बसखाली आले. यावेळी स्टेशनजवळ उपस्थित असलेल्या प्रवाशांनी तातडीने धाव घेत नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात काहीजण मागच्या चाकाखाली अडकले होते. त्यांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळतात पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने पोहचले. तोपर्यंत अनेक जखमी नागरिकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. दरम्यान या दुर्घटनेनंतर नागरिकांचा उद्रेक बघून चालक व वाहकाने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला यात राजावाडी हॉस्पिटलमध्ये एका महिलेला मृत अवस्थेत आणण्यात आले तर मुलुंडच्या एम. टी .अग्रवाल हॉस्पिटलमध्ये तीन जणांचा उपचारासाठी आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. महाजन गंभीर जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाची संपर्क साधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु बेस्ट प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान या दुर्घटनेची पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.