BEST Bus Car Collision Woman Dies
मुंबई : सह्याद्री राज्य अतिथीगृह समोर आज (दि.१२) सकाळी ९ .१० च्या सुमारास बेस्टची इलेक्ट्रिक बस रस्त्यावर उभी असलेल्या कारला धडकली. यावेळी दोन्ही वाहनांमध्ये सापडून एका पादचारी वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. निशा शाह (वय 75, रा. प्रकाश बिल्डिंग, वाळकेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९.१० च्या सुमारास बस विजय वल्लभ चौक येथून कमला नेहरू पार्ककडे जात होती. यावेळी सह्याद्री राज्य अतिथीगृह समोर बस उभ्या असलेल्या कारला घडकली. यात पादचारी महिला बसच्या डाव्या बाजूच्या मागील चाक आणि कारच्या मध्ये सापडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच कारचेही मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर महिलेला तातडीने जवळच्या जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस आणि वाहतूक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक वळवून कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला. या अपघातानंतर पादचारी सुरक्षेला प्राधान्य, बसचालकांचे प्रशिक्षण आणि रस्त्यावरील पार्किंग नियमांच्या कडक अंमलबजावणीची मागणी जोर धरू लागली आहे.