मुंबई: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बस डेपोच्या खाजगीकरणाचा वाद पेटला असताना दुसरीकडे कंत्राटी बेस्ट बसच्या अपघातांचे सत्र अजूनही संपलेले नाही. सोमवारी दुपारी अंधेरी पश्चिम येथे पुन्हा मोठा बेस्ट अपघात झाला.
येथील गोखले पुलाच्या सिग्नलवर कंत्राटी बेस्टने सहा वाहनांना धडक दिली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. काही काळ येथे वाहतूक कोंडी होती. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. ही बस ओशिवरा डेपोची असून ती 'वेट-लीज' तत्त्वावर चालवली जात होती.
बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी १२च्या सुमारास बेस्ट बस अंधेरी बस स्थानक पश्चिम येथून वर्सोवा बस स्थानकाच्या दिशेने जात होती. गोखले पुलाच्या सिग्नलवर येताच या बसने चार रिक्षा, एक एर्टिगा कार आणि एका ॲक्टिव्हा स्कूटरला जोराची धडक दिली.
या अपघातात ५५ वर्षीय रिक्षाचालक एनुस शेख यांच्या नाकाला मोठी दुखापत झाली आहे. तसेच रस्त्यावरून जात असणारे पादचारी मनोजकुमार बाजदेव यांच्या मानेला मोठा मार लागला आहे.
तसेच ॲक्टिव्हा चालक अनिस निसार धारी या तरुणाच्या कमरेच्या उजव्या बाजूला जोराचा मार लागून तो जखमी झाला आहे. अपघातानंतर बेस्ट कंडक्टरने १०० नंबरवर फोन करून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वाहकाने जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, गोखले पुलाच्या सिग्नलवर बस चालकाने हँड ब्रेक सोडला आणि त्यानंतर बस जोराने पुढे सरकली आणि तिच्या पुढे थांबलेल्या चार रिक्षा, एक एर्टिगा कार आणि एका ॲक्टिव्हा स्कूटरला धडक दिल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.
पुढील पोलीस कारवाईसाठी ही बस 'कुमकुम चौकी' येथे उभी करण्यात आली आहे. या अपघाताने काही दिवस थांबलेले बेस्ट अपघातांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने बेस्ट प्रवास कंत्राटी चालकांनी धोक्याचा केला असल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये सुरू आहे.