Mumbai BEST Electric Buses Pudhari
मुंबई

Mumbai BEST Electric Buses: बेस्टच्या ताफ्यात ४८ नव्या इलेक्ट्रिक एसी बस; उपनगरांत पाच मार्गांवर धावणार नव्या बसेस

लवकरच आणखी २३०० बस दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईकरांची सार्वजनिक बेस्ट बस वाहूतक अधिक सक्षम करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने नवीन ४८ नव्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाड्यांचा समावेश आपल्या ताफ्यात केला आहे. या नवीन गाड्यांचे लोकार्पण मंगळवारी बोरिवली येथील मागाठणे आगारात बेस्ट समिती अध्यक्षा विश्वासराव यांच्या हस्ते करण्यात आले.

लवकरच अशा २ हजार ३०० बसगाड्या बेस्ट उपक्रमात दाखल होणार आहेत. दर महिन्याला ५० बस ओलेक्ट्रा कंपनी पुरवणार असल्याचेही अध्यक्षा विश्वासराव यांनी यावेळी स्पष्ट केले.

नव्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाड्यांमुळे गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांची क्षमता वाढणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. १२ मीटर लांबीच्या या बसेस पर्यावरण पूरक आहेत.

ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. या कंपनीला एकूण २,४०० बसेसचे कंत्राट मिळाले आहे. आतापर्यंत ४४ बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या कंपनीच्या एकूण बसची संख्या ९४ वर पोहोचली आहे. या कंपनी मार्फत भाडेतत्त्वावर त्या बेस्ट ताफ्यात असणार आहेत.

येथून धावणार नवीन बसेस...

नव्याने दाखल झालेल्या ४४ बसेस मागाठाणे डेपोतून पाच मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. त्यामध्ये कांदिवली बस स्थानक (पूर्व), चांदीवली येथील संघर्ष नगर, कांदिवली (पूर्व) येथील समता नगर बस स्थानक आणि मागाठाणे डेपो या मार्गाचा समावेश आहे.

आधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर...

नवीन इलेक्ट्रिक बसमधील ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानामुळे अधिक ऊर्जा साठवण क्षमता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे. या तंत्रज्ञानामुळे एका चार्जमध्ये अधिक अंतर पार करणे शक्य होणार आहे.

नव्या ब्लेड बॅटरी बसची संभाव्य क्षमता एका चार्जमध्ये ३२५ ते ५०० किलोमीटरपर्यंत आहे. तसेच जलद चार्जिंग सुविधेमुळे अवघ्या ३० ते ४५ मिनिटांत ३० ते ८० टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज करता येऊ शकते. त्यामुळे बसचा चार्जिंगसाठी लागणारा वेळ कमी होऊन प्रत्यक्ष रस्त्यावर अधिक वेळ बस उपलब्ध ठेवणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT