मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून मंगळवारपासून मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसच्या नियमित सेवेची सुरुवात झाली. ही ट्रेन महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा तीन राज्यांतून प्रवास करणार आहे. कमी वेळेत आणि कमी पैशात आरामदायी प्रवास या एक्सप्रेसने करणे शक्य झाल्याने मुंबईकरांनी पहिल्याच दिवसापासून या ट्रेनला पसंती दिली आहे. त्यामुळे पुढील १६ नोव्हेंबरपर्यत या गाडीची आरक्षित तिकिटे प्रतीक्षा यादीत गेली आहेत.
एसएमव्ही बेंगळुरू स्थानकावर १ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू- मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला गेला. मुंबईत सोमवार, २ नोव्हेंबरपासून या गाडीची नियमित सेवा सुरू करण्यात आली आहे. 'हावडा - कामाख्या वंदे भारत एक्सप्रेसनंतर, देशातील ही दुसरी 'स्लीपर वंदे भारत' ट्रेन ठरली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील प्रवाशांसाठी ही ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
मुंबईत गाडी क्र. २७६५१ सीएसएमटी - एसएमव्ही बेंगळुरू स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येत आहे. आठवड्यातून ६ दिवस (मंगळवार वगळता) सीएसएमटी येथून २०:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता एसएमव्ही बेंगळुरू येथे पोहोचणार आहे.
या गाडीला कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, यादगीर, रायचूर, गुंतकल आणि अनंतपुर असे थांबे आहेत. या गाडीला मुंबईकरांनी सोमवारपासून मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे पहिले सलग तीन दिवस थर्ड एसीचे आरक्षित तिकिट प्रतिक्षा यादी ६० च्या वर आहे. तसेच पुढे १६ नोव्हेंबरपर्यत थर्ड एसी, सेकंड एसीच तिकीट प्रतीक्षा यादीत आहे. तसेच काही दिवस आरक्षण रिग्रेट झालेले आहे. अशी आहे सेवा
मुंबई ते बेंगळुरू (ट्रेन क्र. २७६५१) सीएसएमटी येथून रात्री ८:१० वा. सुटेल मंगळवारी गाडी बंद राहील दोन्ही दिशांनी अंदाजे १६ तास १० मिनिटांचा प्रवास.