Mumbai Beach Garbage Pudhari
मुंबई

Mumbai Beach Garbage: मुंबईच्या किनारी कचऱ्यांचे ढीग! किनारपट्ट्यांच्या दुरवस्थेची भीषणता समोर

किनारपट्ट्यांची दुरवस्थेची भीषणता समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सागरी किनारी कचरा टाकू नका, असे वारंवार महापालिकेडून मुंबईकरांना सांगितले जाते. एवढेच नव्हे तर कचरा हा निर्माल्य पेटीतच टाका असे ठिकठिकाणी बोर्ड लावलेले असतात. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करत मुंबईकर सागरी किनाऱ्यावर कचरा टाकताना दिसत आहेत.

त्याचा विपरित परिणाम समोर आला असून समुद्राला आलेल्या भरतीमुळे मुंबईकरांनी टाकलेल्या कचऱ्याचे ढीग पुन्हा किनाऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जुहू आणि दादर चौपाटीसह प्रमुख चौपाट्यांचे विद्रुपीकरण जोरात होत आहे. याची दृश्ये सोशल मीडियावर समोर आली आहेत. यातून किनारपट्ट्यांची दुरवस्थेची भीषणता समोर आली आहे.

दादर चौपाटीवरील समोर आलेल्या फोटोंमध्ये, भरतीसोबत किनाऱ्यावर आलेल्या कचऱ्यात महापालिका कर्मचारी प्लास्टिकच्या विस्तीर्ण ढिगाऱ्यात उभा दिसतो आहे. तर जुहू चौपाटीवरूनही अशीच दृश्ये समोर आली आहेत. तिथे प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, थर्मोकोल, पादत्राणे, कपड्यांचे तुकडे, नारळ आणि इतर कचरा वाळूवर विखुरलेला दिसत आहे.

त्यातच किनारपट्टीवर अनेक ठिकाणी सांडपाण्याने दूषित झालेले पाणीही स्पष्टपणे दिसत आहे. पावसाळ्यात हा प्रश्न अधिक गंभीर होतो. मुसळधार पावसामुळे योग्य रीतीने विल्हेवाट न लावलेला कचरा नाल्यांमधून आणि जलवाहिन्यांमधून अरबी समुद्रात वाहून जातो. त्यानंतर समुद्राला येणाऱ्या भरतीच्या लाटांसोबत हाच कचरा प्रचंड प्रमाणात जुहू, दादर आणि गिरगाव चौपाटीसारख्या किनाऱ्यांवर परत येतो.

कॅमेऱ्याने टिपला कचरा

कचऱ्याची विल्हेवाट जबाबदारीने करा, आणि प्लास्टिक नाल्यांमध्ये जाण्यापासून रोखा असे आवाहन मुंबई महापालिकेकडून केले जाते. परंतु मुंबईकरांमध्ये शहाणपण येत नाही. खास करून मुंबईकर अनेकदा केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी ही घाण जाणूनबुजून दाखवत असल्याचा आरोप महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र दीपक साळवी यांच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये हा कचरा टिपला गेला आहे. त्यामुळे कॅमेरा खोटे बोलू शकत नाही. परिणामी महापालिकेचा आरोपही फिजूल आहे, अशा प्रतिकिया व्यक्त होत आहेत.

याला जबाबदार कोण?

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी नियमितपणे सफाई मोहीम राबवत असले, तरी पुढच्या भरतीसोबत पुन्हा नवा कचरा किनाऱ्यावर वाहून येतो. याला जबाबदार कोण ? असा सवाल केला जात आहे. कचऱ्याचे अयोग्य वर्गीकरण, तुंबलेले नाले, अपुरे घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या मुंबईकरांच्या सवयी यास जबाबदार आहेत, अशाही प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT