मुंबई : सेक्स्टॉर्शन करुन एका तरुणाकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी मोहम्मद शमशाद खान ऊर्फ गाझी या आरोपीस वांद्रे पोलिसांनी अटक केली. अश्लील व्हिडीओ डिलीट करण्यासाठी त्याने खंडणीसाठी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
यातील तक्रारदार तरुण वांद्रे येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामला आहे. जुलै महिन्यांत त्याला इंटाग्रामवर एक रिक्वेस्ट आलली होती. ती रिक्वेस्ट त्याने स्विकारली होती. त्यानंतर त्याला एका तरुणीकडून सतत मॅसेज येऊ लागले. या तरुणीने ती नाशिक येथे राहत असल्याचे सांगून त्याच्याकडून गोड बोलून व्हॉटअप क्रमांक मिळविला. त्यानंतर त्यांच्यात चॅट सुरु झाले होते.
काही दिवसांपूर्वी तिने त्याला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी या तरुणीने तिच्या अंगावर काहीच कपडे घातले नव्हते. तिने त्यालाही सर्व कपडे काढण्यास प्रवृत्त केले. तिच्यावर विश्वास ठेवून त्याने तिच्यासमोर सर्व कपडे काढले होते. त्याचे तिने व्हिडीओ बनविले होते. तो व्हिडीओ त्याला पाठवून त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून खंडणीसाठी धमकी येत होती. त्याने पैसे दिले नाहीतर त्याचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तो त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता. बदनामीच्या भीतीने त्याने त्याला ऑनलाईन २७ हजार रुपये पाठविले. तरीही तो त्याच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होता. त्यामुळे त्याने घडलेला प्रकार वांद्रे पोलिसांना सांगून अज्ञात तरुणीसह फसवणुकीसह खंडणीसाठी धमकाविणार्या आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.