Mumbai Local
बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात आज (दि. १४) सकाळी लोकल ट्रेन उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. मुबंईकडे जाण्याऱ्या लोकल जवळपास अर्धा तास उशिराने धावत असल्याने स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. दररोजच्या या विलंबामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास उशीर होत असल्याने प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्या केबिनबाहेर गर्दी करून जाब विचारला.
आज सकाळी ७ वाजून १४ मिनिटांची लोकल अर्धा तास होऊनही स्थानकावर दाखल झाली नव्हती. यामुळे नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. लोकल गाड्या नेहमीच उशिरा धावत असल्याने कामावर पोहोचायला उशीर होतो, अशी प्रवाशांची तक्रार आहे. या सततच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी एकत्र येत स्टेशन मास्तरच्या केबिनबाहेर गर्दी केली आणि लोकल ट्रेनच्या वेळापत्रकातील विलंबाबद्दल प्रशासनाला जाब विचारला.
यावेळी प्रवाशांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. मेल एक्सप्रेस गाड्यांना बदलापूर स्थानकात थांबा देऊन प्रवाशांना त्यातून प्रवास करण्याची मुभा द्यावी, तसेच लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.