Arrested Pudhari
मुंबई

Mumbai ATS Action: जैश-ए-मोहम्मदशी संबंधांवरून तरुणाला माहीममध्ये अटक

मसूद अजहरच्या भाषणांच्या ऑडिओ क्लिप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील माहीम परिसरात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करून ३३ वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक केली आहे. पाकिस्तानस्थित प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

आरोपीच्या मोबाईलमध्ये संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याच्या भाषणांच्या ध्वनिमुद्रिका, तसेच समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर आढळल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

एटीएसच्या काळाचौकी युनिटने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे माहीम मेट्रो स्थानकाजवळील लक्ष्मी बिल्डिंग परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. मोहम्मद हसन हा माहीम परिसरात अत्तर विक्रीचा व्यवसाय करत होता.

तसेच तो रॅपिडो दुचाकी टॅक्सीचालक म्हणूनही काम करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्या दैनंदिन व्यवहारांसोबतच समाजमाध्यमांवरील हालचाली आणि ऑनलाइन संपर्कांची तपासणी केली जात आहे.

टेलिग्राम समूहातून भाषणांचा प्रसार?

तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या मोबाईलमधील टेलिग्राम समूहात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याच्या भाषणांच्या दोन ध्वनिमुद्रिका आढळल्या. या भाषणांमध्ये बाबरी मशीद आणि अन्य विषयांचा उल्लेख आहे.

'इब्न-ए-कासिम' नावाच्या टेलिग्राम वाहिनीशीही आरोपीचा संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या वाहिनीचा वापर कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी केला जात होता का, याची पडताळणी केली जात आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील पोस्टही तपासाच्या कक्षेत

आरोपीच्या समाजमाध्यम खात्यांवरील पोस्ट आणि टिप्पण्यांचीही एटीएसकडून तपासणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील कथित त्रुटींविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर आरोपीने केलेली टिप्पणी तपास यंत्रणांच्या निदर्शनास आली आहे.

मे ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत समाजमाध्यमांवर करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पण्यांचाही तपासात समावेश असल्याचे वृत्त आहे. एटीएसने या पोस्ट आणि टिप्पण्यांचे स्क्रीनशॉट पुराव्यासाठी नोंदवून ठेवल्याचे सांगितले जाते.

भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. विविध समूहांमध्ये धर्म, भाषा आदी आधारांवर वैमनस्य निर्माण करणे आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचवणाऱ्या कृत्यांशी हे कलम संबंधित आहे.

आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यातील डिजिटल पुराव्यांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेमार्फत तपासणी केली जात आहे. तपासातून दहशतवादी संघटनेशी प्रत्यक्ष संबंध किंवा व्यापक कटात सहभागाचे पुरावे मिळतात का, यावर पुढील कारवाई अवलंबून असेल.

पाकिस्तानी संपर्कांची चौकशी

आरोपीचा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क होता का, हा या तपासातील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्या मोबाईलमधील संदेश, टेलिग्रामवरील संवाद, समाजमाध्यमांवरील संपर्क आणि अन्य डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे. आरोपीच्या संपर्कात आणखी कोणी होते का, त्याने इतर व्यक्तींना कट्टरतावादी विचारांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता का आणि या प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT