मुंबई : दिवसभर मुलांची सेवा करून झाल्यानंतर संध्याकाळ पाचनंतर निवडणूक कामासाठी जुंपले जात आहे. यामुळे मुंबईतील आंगणवाडी सेविका त्रस्त असून त्यांना आपला संताप महापालिका आयुक्त व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे. आंम्ही नोकर आहोत, मशीन नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असून महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, आंगणवाडी सेविकांना सायंकाळी पाचनंतर मतदार यादी, प्रशिक्षण आणि निवडणुकांशी संबंधित काम करावे लागत आहे. मुंबईत 10,000 अंगणवाडी सेविका असून यापैकी सुमारे 1500 जणांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचा परिणाम आमच्या कौटुंबिक जीवनावर, आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होत आहे. ‘सेवेच्या’ नावाखाली सुरू असलेले हे ‘शोषण’ आता असह्य होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही मुलांची सेवा करण्यासाठी येथे आहोत. निवडणुकीच्या कामाची आमच्यावर जबरदस्ती आहे. जर अधिकार्यांना असे वाटत असेल की, आम्ही निमुटपणे काम करीत राहू तर तसे होणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
अंगणवाडी सेविकांनी सांगितले की, दिवसभर लहान मुलांची काळजी घेणे सोपे नाही. आता त्यानंतरही त्यांना मतदार यादी, घरोघरी सर्वेक्षण, प्रशिक्षण यासारख्या कामांमध्ये तासनतास गुंतवून ठेवले जात आहे. याचा त्यांच्या जेवणाच्या वेळेवर, विश्रांतीवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. या दुहेरी कर्तव्याविरुद्ध, सेविकांनी एकत्र येऊन मुंबई महानगरपालिका आयुक्तांना तीव्र निषेधाचे निवेदन सादर केले आहे. जर हा निर्णय लवकरच मागे घेतला नाही तर त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.