Mumbai High Tide Alert Update
मुंबई : आज (सोमवार, २४ जून) समुद्राला या वर्षातील सर्वात मोठी भरती येणार आहे. दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी समुद्राला उधाण येणार असून, यावेळी तब्बल ४.७५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ही केवळ आजची स्थिती नसून, २४ जून ते २८ जून असे सलग पाच दिवस समुद्राला मोठ्या भरतीचा कालावधी असणार आहे. या काळात समुद्राचे वर्तन अधिक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, प्रशासनाने मुंबईसह किनारपट्टीवरील नागरिकांना आणि विशेषतः पर्यटकांना समुद्राजवळ न जाण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच पाण्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी बचाव पथके आणि संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.