मुंबई : बँकाँकहून आणलेला वीस कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेसह दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. फातिमा सलीम सय्यद आणि अरमान मोहम्मद अशी या दोघांची नावे असून यातील फातिमा ही मुंब्रा तर अरमान हा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे.
अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. गेल्या काही वर्षांत बँकाँकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाच्या तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे बँकाँकहून येणाऱ्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची कस्टम अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली आहे. ही मोहीम सुरु असताना शनिवारी बँकाँकहून आलेल्या फातिमा सय्यद आणि अरमान मोहम्मद या दोन प्रवाशांना संशयावरुन हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या सामानाच्या झडतीत या अधिकाऱ्यांना वीस किलो हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे वीस कोटी रुपये इतकी आहे.
तपासात त्यांना गांजा बँकाँक येथे एका व्यक्तीने मुंबईत त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यासाठी दिला होता. त्यासाठी बँकाँक ते मुंबई असा विमान तिकिटासह काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती, मात्र या गांजाची डिलीव्हरी करण्यापूर्वीच या दोघांनाही या अधिकाऱ्यांनी अटक केली. यातील फातिमा ही तिच्या कुटुंबियांसोबत मुंब्रा येथे राहते तर अरमान हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघेही बँकाँकला गेले होते. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना रविवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.