मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी वायू प्रदूषणामध्ये शनिवारच्या (190) तुलनेत किंचित घट दिसून आली. रविवारी सरासरी एक्यूआय 184 इतका होता. शहर आणि उपनगरांमध्ये सक्रिय असलेल्या 23 आयएमडी स्टेशन्सपैकी केवळ शिवाजीनगर, गोवंडी येथील एक्यूआय मात्र दोनशेपारच (223) होता.
मागील दोन दिवसांच्या तुलनेत वडाळा (182) आणि पवईतील (179) हवा प्रदूषणात सुधारणा झाली. चारकोप (193), जुहू तारा (194), कुर्ला (186), चकाला, अंधेरी (184), देवनार (178) आणि सायनमधील (175) एक्यूआय दोनशेच्या खाली आला. 150 ते 200 दरम्यानचा एक्यूआय हा खराब हवेच्या कॅटेगरीमध्ये मोडत असला, तरी मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात प्रदूषण कमी झाले आहे.
वायू प्रदूषणात घट झाली असतानाच तापमानात वाढ झाली. सांताक्रूझ वेधशाळेत रविवारी किमान 20 आणि कमाल 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी (20/31 अंश सेल्सिअस)
किमान तापमानाची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र, कमाल तापमानात एका अंशाने वाढ होईल. मंगळवारपासून (19 अंश सेल्सिअस) किमान तापमानात घट होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. सकाळी आणि रात्री थंडी तसेच दुपारी उन्हाचा तडाखा पाहता आर्द्रतेचे प्रमाण नव्वदीच्या घरात कायम आहे. रविवारी 93 टक्के आर्द्रतेची नोंद झाली.
मुंबई : शनिवारी 190 असलेला मुंबईचा एक्यूआय रविवारी
184 वर आला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत वायू प्रदूषणात किंचित घट झाली असली, तरी एक्यूआयचा 184 हा आकडादेखील खराब हवाच दर्शवतो. (छाया : दीपक साळवी)