Mumbai Air Pollution Control Pudhari
मुंबई

Mumbai Air Pollution Control: मुंबईकरांच्या श्वासावर धुळीचे संकट; २४ विभागांत २४० हॉटस्पॉटवर महानगरपालिकेची करडी नजर

बांधकामे, राडारोडा, कचरा जाळणे आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष; प्रत्येक हॉटस्पॉटसाठी जबाबदार अधिकारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत १० वायु प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करण्यात येणार आहेत.

बांधकामे व पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा कामे, कचरा जाळण्याची ठिकाणे, राडारोडा टाकण्याची ठिकाणे व वाहतूक कोंडीची ठिकाणे यांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा - २०२६ तयार झाला असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या कृती आराखड्यानुसार प्रत्येक विभागात किमान १० वायू प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांची अद्ययावत यादी व नकाशा तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक हॉटस्पॉटसाठी जबाबदार अधिकारी निश्चित करून नियमित देखरेख करण्याच्या सूचनाही महापौर रितू तावडे यांनी केल्या आहेत.

बांधकाम व पाडकामस्थळांवर मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम स्थळांवर कारणे दाखवा नोटीस, कामबंदीची नोटीस तसेच आवश्यकतेनुसार सील करण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे.

प्रत्येक पथकाने दररोज किमान दोन बांधकाम स्थळांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाडकामाच्या वेळी योग्य बॅरिकेडिंग, ताडपत्री अथवा हिरव्या कापडाने झाकणे सातत्याने सूक्ष्म जलफवारणी करणे आवश्यक राहणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

पोस्ट-मॉन्सून डीप क्लीनिंग ड्राईव्ह

धूळ कमी रस्त्यांवर साचलेला गाळ, चिखल आणि धूळ हटविण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ‘पोस्ट-मॉन्सून डीप क्लीनिंग ड्राईव्ह’ राबविण्यात येणार आहे. मुंबईतील सर्वच प्रमुख रस्ते, दुभाजक व चौकांची महापालिकेकडून स्वच्छता करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तेथे पाण्याने रस्ते धुतले जाणार आहेत.

कचरा जाळण्यास मनाई

मोकळ्या जागी कचरा जाळण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रभाग स्तरावरील मार्शल्स व सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील व उपनगरातील अशा घटनांवर देखरेख ठेवण्यात येणार असून प्रमुख वाहतूक मार्ग व वाहतूक कोंडीच्या ठिकाणी विशेष पीयूसी तपासणी मोहीम राबवून धूर सोडणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

डेब्रिज तसेच कचरा वाहतूक वाहने पूर्णपणे झाकण्यात येणार

बांधकाम व पाडकाम कचरा वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असणे व सार्वजनिक रस्त्यावर येण्यापूर्वी त्यांच्या चाकांची स्वच्छता करणे आवश्यक राहणार आहे.

रेडी मिक्स काँक्रिट वाहनांमधून रस्त्यावर काँक्रिट, अन्य सामग्री सांडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वायू गुणवत्ता निर्देशांकावर सातत्याने देखरेख ठेवून परिस्थितीनुसार उपाययोजना करण्यात येणार आहेत. वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक झाल्यास संबंधित परिसरात विशेष सखोल स्वच्छता, आवश्यक असेल तर रस्ते धुणे, पाण्याची फवारणी, मिस्टिंग तसेच खुल्या जागी कचरा जाळण्यावर कडक नियंत्रण यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. एखाद्या ठिकाणी हा निर्देशांक सलग तीन दिवस ३०० पेक्षा अधिक राहिल्यास, त्या भागापासून २ किलोमीटर परिसरातील प्रदूषणकारी कामे बंद करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
-अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT