Mumbai Air Pollution News
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांना वायू प्रदूषणाचा घेराव कायम असून सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 223 वर पोहोचला आहे.
एक्यूआय संकेतस्थळाच्या माहितीनुसार, गेले तीन दिवस एक्यूआय दोनशेपार असून गुरुवारी सव्वादोनशेच्या घरात गेला. 200 ते 300 दरम्यानचा एक्यूआय आरोग्यासाठी खूपच घातक हवा या कॅटेगरीमध्ये मोडतो. पीएम 10 आणि पीएम 2.5 च्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी हेच प्रमाण अनुक्रमे 190 आणि 148 मायक्रो-ग्राम्स पर क्युबिक मीटर इतके नोंदले गेले.
मुंबईत सध्या सर्वत्र वायू प्रदूषण आहे. त्यात वडाळा ट्रक टर्मिनस येथील ( एक्यूआय 253) हवा सर्वात प्रदूषित आहे. प्रदूषणाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांमध्ये शिवाजी नगर,गोवंडी (249), परळ, भोईवाडा (246), तसेच पश्चिम उपनगरांमध्ये बोरिवली, पूर्व (240) व मालाड (224) आणि कुलाबा (219), वरळीचा (218) समावेश आहे.
दरम्यान, सांताक्रुझ वेधशाळेच्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी किमान 23 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी आणि शुक्रवारी (23/33 अंश सेल्सिअस) कमाल तापमानात थोडी घट होऊ शकते. वीकेंडला वातावरण ढगाळ राहील. तसेच काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
प्रदूषणाचे हॉटस्पॉट
ठिकाण एक्यूआय
वडाळा - 253
शिवाजी नगर -249
परळ (भोईवाडा) -246
बोरिवली (पूर्व) - 240
मालाड - 224
कुलाबा -219
वरळी -218