मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषणाने टोक गाठले असून शहर आणि उपनगरांतील प्रमुख ५ ठिकाणी हवा प्रचंड दूषित आहे. १० ठिकाणची हवा आरोग्यास घातक आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. गेले ४-५ दिवस मुंबईतील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धुरके दिसून येत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या (एक्यूआय) संकेतस्थळावरील माहितीनुसार, काल मालाड (एक्यूआय ३२१), माझगाव (३१३), नेव्हीनगर कुलाबा (३०६), सिद्धार्थनगर, वरळी (३०३) आणि वांद्रे-कुर्ला संकुल-बीकेसी (३०२) या पाच ठिकाणी प्रदूषणाची पातळी अति खराब हवा कॅटेगरीमध्ये नोंदली गेली. या प्रमुख ठिकाणांसह १० ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० दरम्यान आहे. ही पातळी आरोग्यास अपायकारक हवेची आहे. या कॅटेगरीमध्ये वांद्रे-पूर्व (२७३), बोरिवली-पूर्व (२०७), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (२४७), देवनार (२३३), जुहू (२०२), भांडूप-पश्चिम (२२२), अमेरिकन वकिलाती कार्यालय (२७३), नेरूळ (२४५), सायन (२११), विलेपार्ले (२०२) आदी ठिकाणांचा समावेश आहे. प्रदूषणाचा स्तर खालावत असतानाच पारा विशीच्या आत आल्याने मुंबईत थंडीचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) सांताक्रुझ वेधशाळेमध्ये काल किमान २० अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. आज त्यात एकाने घट अपेक्षित आहे. किमान तापमानात घट होतानाच ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला पारा १५ अंशांवर येऊ शकतो.