Mumbai Bribery Case pudhari photo
मुंबई

Mumbai Bribery Case : निकाल बाजूने देण्यासाठी वकिलाकडून ३० हजार लाच

सहायक निबंधक प्रदीप सानप एसीबीच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदत्वाच्या वादाचा निकाल अर्जदाराच्या बाजूने देण्यासाठी आणि निकालाची प्रत देण्यासाठी वकिलाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ पकडले. प्रदीप कारभारी सानप (५२) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तडजोडीनंतर ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

मस्जिद बंदर येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था, ई विभागाच्या कार्यालयात सहायक पोलीस आयुक्त गंगाप्रसाद मुदिराज यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

या प्रकरणातील तक्रारदार यांच्या अशिलाने माझगाव को-ऑपरेटिव्ह हाऊंसिंग सोसायटीमध्ये सदनिका खरेदी केली होती. मात्र, सोसायटीकडून त्यांना सभासदत्व दिले जात नसल्याने त्यांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था, ई विभागाकडे अर्ज केला होता. या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी तक्रारदार यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या प्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल अशिलाच्या बाजूने देण्यासाठी तसेच निकालाची प्रत देण्यासाठी सानप यांनी २८ ऑक्टोबर रोजी वकिलाकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने वकिलाने ४ नोव्हेंबर रोजी मुंबई एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, सानप यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

बुधवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना सानप यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दुपारी चारच्या सुमारास त्यांना कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान सानप यांची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT