मुंबई : माणुसकीला आणि कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. त्वचेच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्याच नातवाने सडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले होते. पोलिसांनी माणुसकी दाखवत तिला रूग्णालयात दाखल केले आहे. (Mumbai News)
शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३२ कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वृद्ध महिला सापडली. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच आरे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना ६० ते ७० वयोगटातील एक महिला गुलाबी नाईटड्रेसमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असहाय्य अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर त्वचेच्या गंभीर कर्करोगामुळे झालेली एक मोठी जखम होती, जी चिघळली होती. तिच्या गालाला आणि नाकाला पूर्णपणे संसर्ग झाला होता. तिची अवस्था पाहून पोलीस अधिकारीही सुन्न झाले.
पोलीस हवालदार राठोड आणि महिला पोलीस शिपाई निकिता कोळेकर यांनी तातडीने त्या वृद्ध महिलेला पोलीस व्हॅनमध्ये बसवून जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र, तिथे सुविधा नसल्याचे कारण देत रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी तिला कूपर रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी केवळ वरवरची तपासणी करून अधिक सुसज्ज रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. एकीकडे महिलेची प्रकृती अधिकच खालावत होती आणि दुसरीकडे कोणतेही रुग्णालय तिला दाखल करून घ्यायला तयार नव्हते. पोलिसांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. तब्बल आठ तासांनंतर, सायंकाळी ५.३० च्या सुमारास, कूपर रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी स्वतः रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, तर दोन्ही पोलीस शिपाई त्या वृद्ध महिलेसोबत थांबून होते.
त्या महिलेने आपले नाव यशोदा गायकवाड असे सांगितले. तिने पोलिसांना सांगितले की, मालाडमध्ये आपल्या नातवासोबत ती राहत होती. नातवानेच तिला सकाळी आरेमध्ये आणून कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी फेकून दिले. आरे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले, "आम्हाला फोनवरून माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. तिची प्रकृती चिंताजनक होती. पण त्यानंतर जे घडले ते अधिक धक्कादायक होते; रुग्णालये उपचारासाठी दाखल करून घेत नव्हतीत. जर पोलीस एका अनोळखी व्यक्तीसाठी इतकी कटिबद्धता दाखवू शकतात, तर सरकारी रुग्णालये थोडी माणुसकी का दाखवू शकत नाहीत?"
यशोदा यांनी पोलिसांना मालाड आणि कांदिवली येथील दोन पत्ते दिले. पोलीस पथकांनी दोन्ही ठिकाणी जाऊन चौकशी केली, परंतु कोणीही त्यांची ओळख पटवू शकले नाही. तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी तिचा फोटो मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. तिला तेथे कसे आणले गेले, हे शोधण्यासाठी पोलीस आरे जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र, कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ कोणताही कॅमेरा नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील म्हणाले, "आम्ही त्यांच्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अद्याप माहिती मिळालेली नाही. जर कोणी त्यांना ओळखत असेल, तर त्यांनी तात्काळ आरे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा," असे आवाहन त्यांनी केले आहे.
कूपर रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांनी महिलेला दाखल करून घेतल्याचे सांगितले. "आरे पोलिसांनी संबंधित महिलेला आणले. तिच्यावर कान-नाक-घसा (ENT) विभागाचे डॉ. एन. एस. जी. यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तिच्या नाक व गालावर अल्सेरोप्रोलिफरेटिव्ह वाढ (ulceroproliferative growth) दिसून येत आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिला ‘बॅसल सेल कार्सिनोमा’ (Basal Cell Carcinoma) असल्याचे प्राथमिक निदान झाल्याचे डॉ. मेढेकर यांनी सांगितले.