Mumbai water shortage | मुंबईत 500 दशलक्ष लिटर्स पाण्याचा तुटवडा file Photo
मुंबई

Mumbai water scarcity | सरसकट मुंबईकरांना मुबलक पाणी नाहीच, 500 दशलक्ष लिटर्सपेक्षा जास्त पाण्याचा तुटवडा

मुंबई शहराला किमान रोज 4,500 दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहराला सुमारे दररोज 3950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असला तरी, शहरात सुमारे 500 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे तलाव तुडुंब भरलेली असली तरी, सरसकट मुंबईकरांना मुबलक पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

मुंबई शहर व उपनगराची लोकसंख्या जवळपास 1 कोटी 35 लाखाच्या घरात आहे. त्याशिवाय मुंबईत कामधंद्यानिमित्त आजूबाजूच्या शहरातून रोज 50 ते 60 लाख नागरिक येतात. हे नागरिक दिवसभर मुंबईत असल्याने पिण्याच्या पाण्यासह कार्यालयासह सार्वजनिक शौचालयसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. त्यामुळे मुंबई शहराला किमान रोज 4,500 दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात 950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. पण गळतीच्या माध्यमातून 7 ते 8 टक्के म्हणजेच सुमारे 280 ते 300 दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्याचा अपुरा पुरवठा होतो. विशेषतः शहरातील उंचावरील भागासह जलाशयापासून लांब असलेले भाग, झोपडपट्टी आदी परिसरात पाणीटंचाई भासते. पाण्याची कमतरता, पाण्याचा कमी दाब, जलवाहिन्या फुटणे, ठिकठिकाणी होणार्‍या गळतीमुळे मुंबईतील अनेकजण पाणीटंचाईचा सामना करतात.

मुंबई शहराला सध्या 7 धरणांतून पाणीपुरवठा होतो. यातील एकट्या भातसा धरणातून रोज 2050 म्हणजे 50 टक्केपेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो. मुंबई महापालिकेची स्वतःची 5 तलाव असतानाही मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तलावांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गारगाई व पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.

2041 पर्यंत 6535 दशलक्ष लिटर पाण्याची गरज

मुंबईत सध्याच्या 1 कोटी 35 लाख लोकसंख्येसाठी सध्याचा पाणीपुरवठा कमी पडत आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या अभ्यासानुसार 2041 पर्यंत मुंबईची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 72 लाखाच्या घरात पोहचणार आहे. त्यामुळे रोज 6,535 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. एवढ्या मोठ्या पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेला गारगाई, पिंजाळ, दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे.

चितळे कमिटीच्या शिफारशीकडे दुर्लक्ष

मुंबई शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ञ समितीने शिफारस केल्यानुसार मुंबई महापालिकेने पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शहरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासू शकते. महापालिकेने गारगाई, पिंजाळ व दमनगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पाला चालना दिल्यास पाणी पुरवठ्यात रोज 2,881 दशलक्ष लिटर्सने वाढ होणार आहे. यात गारगाई प्रकल्पातून रोज 440 दशलक्ष लिटर्स, पिंजाळमधून 865 दशलक्ष लिटर्स व दमनगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पातून 1,586 दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT