मुंबई : परळ येथील एका ज्वेलर्स शॉपमधील सुमारे चार कोटींचा मुद्देमाल चोरी करून पळून गेलेल्या सेल्समनसह तिघांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली. जितू ऊर्फ जितेंद्र नवाराम चौधरी, कमलेश वाघाराम चौधरी आणि भरतकुमार ओटाराम चौधरी अशी तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. तिघांकडून पोलिसांनी सव्वातीन कोटीचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
69 वर्षांचे तक्रारदार परळ येथे राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांच्याकडे जितू चौधरी हा जानेवारी 2025 पासून सेल्समन म्हणून कामाला होता. एप्रिलमध्ये तो त्याच्या गावी गेला होता. त्यानंतर तो ऑगस्टमध्ये पुन्हा कामावर रुजू झाला. दिवसभर काम करून तो रात्री ज्वेलर्स शॉपच्या पोटमाळ्यावर झोपत असे.
8 सप्टेंबरला त्यांच्या शॉपला सुट्टी होती. याच संधीचा फायदा घेऊन त्याने ज्वेलरी शॉपच्या लॉकरमधून सुमारे चार कोटीचे विविध सोन्याचे दागिने आणि 3 लाख 53 हजारांची रोकडे घेऊन पलायन केले. 9 सप्टेंबरला तक्रारदार त्यांच्या दुकानात आल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी जितूला कॉल केला, मात्र त्याचा कॉल बंद येत होता. चौकशीदरम्यान त्यांना जितू 8 सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता एक बॅग घेऊन शॉपमधून निघून गेल्याचे समजले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी भोईवाडा पोलिसांना ही माहिती सांगून जितू चौधरीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.