मुंबई : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सरू असतानाच मंगळवारपासून मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीसाठी 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन उमेदवारी अर्ज आणि शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत ऑफलाईन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, महायुती अथवा महाविकास आघाडीत अद्याप युती-आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत एकाही महापालिकेत युती आणि आघाडीसंदर्भात सत्ताधारी किंवा विरोधकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. प्रामुख्याने मुंबईत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोबत घ्यायचे की नाही यावरून घोळ सुरू आहे. याशिवाय नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महत्त्वाच्या महापालिकांसह इतर महापालिकांमध्ये युती-आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नाही.