Mumbai landslide risk pudhari photo
मुंबई

Mumbai landslide risk : कुर्ल्यातील भूस्खलनाने पुन्हा धडकी; मुंबईतील २४९ वस्त्यांवर दरडीचा धोका

सर्वाधिक हाॅटस्पाॅट भांडुप, घाटकोपर, कुर्ला विभागातील

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : प्रकाश साबळे

पूर्व उपनगरांतील कुर्ला एल वाॅर्डातील चिराग नगर, गौसीया चाळ येथे बुधवारी भूस्खलन होऊन ७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, तर ७ जण जखमी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा मुंबई महानगरातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टयांमधील भूस्खलनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई शहरात आजमितीला २४९ झोपडपट्टया या भूस्खलनाच्या छायेखाली असून याठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यात सर्वाधिक भूस्खलनाचे हाॅटस्पाॅट भांडुप, घाटकोपर, कुर्ला आहेत.

मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील नागरिकांचे डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. कारण याठिकाणी स्वस्तात घर भाड्याने आणि विकत मिळते. तसेच महानगरपालिकेच्या सर्व मूलभूत सुविधाही मिळतात. तसेच याठिकाणी श्रमिक वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने नाईलाजाने त्यांना अशा कमी पैशात अशाठिकाणी वास्तव्य करण्यास सोयीचे जाते.

मात्र पावसाळ्यात अशा ठिकाणी भूस्खलनाच्या दुर्घटना घडून नागरिकांचे नाहक बळी जातात. म्हाडा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अशा धोकादायक वस्त्यांच्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. परंतु सरकारी पातळीवर गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे असल्याने परिणामी त्यांना दरडीच्या छायेखाली वास्तव्य करावे लागत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या २४ वाॅर्डापैकी एस, एन, एल आणि डी विभागात सर्वाधिक वस्त्या या डोंगराळ भागात मोडतात. या विभागातील झोपडीधारकांना खबरदारी म्हणून महानगरपालिकेकडून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सुरक्षितस्थळी स्थलांतरांच्या नोटीसा दिल्या जातात. मात्र फक्त पावसाळ्यामुळे इतरत्र स्थलांतर करणे आणि पर्यायी व्यवस्था नसल्याने सदर झोपडीधारक आपल्या कुटुंबियांसह आहे, त्याच ठिकाणी दिवस काढतात. अशी परिस्थिती येथील झोपडीधारकांची आहे.

मुंबईतील डोंगरउतारांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत/दाट वस्ती, उतारावरील बांधकामे, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवरील दबाव आणि अतिवृष्टी ही प्रमुख कारणे भूस्खलनाची आहेत. २०२६ मधील मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, सन २०२३ पासून भूस्खलन प्रतिबंधासाठी सुरू केलेल्या ७४९ कामांपैकी ४४० कामे पूर्ण, तर २३९ कामे प्रलंबित किंवा अद्याप सुरू झालेली नाहीत. या धोकादायक उतारांच्या परिसरात जवळपास एक लाख नागरिक राहत असल्याचेही अहवालात नमूद आहे.

मुंबईत आतापर्यंत झालेल्या घटना

  • १२ जुलै २०००

  • ०५ जुलै २०२०

  • १८ जुलै २०२१ चेंबूर, विक्रोळी

  • २६ जुलै २०२५

  • जुलै २०२६ भाडुंप परिसर

  • ५ ऑगस्ट २०२०

  • १२ ऑगस्ट २०२६ कुर्ला, चिराग नगर

मुंबईतील दरडग्रस्त वस्त्यांची वाॅर्डनिहाय संख्या

डी - १५, ई -०२, एफ.साऊंथ -०६, एफ.नाॅर्थ - ०४, जी.नाॅर्थ - १०, एच.वेस्ट -०१, के.ईस्ट -०५, के.वेस्ट -०२, पी.दक्षिण -०२, पी.पुर्व -११, आर.दक्षिण -०३, आर.मध्य -०४, आर.नाॅर्थ - ०३, एल वाॅर्ड -१७, एम.पुर्व -१०, एम.वेस्ट -०१, एन वाॅर्ड - ३२, एस वाॅर्ड -११६, टी वाॅर्ड - ५

वाॅर्डनिहाय असुरक्षित वस्त्या

ए लाॅर्ड -०८, डी - ११, ई -१०, एफ.साऊंथ -०१, जी.साऊंथ -०५, जी.नाॅर्थ -०१, एच.वेस्ट -०३, के.वेस्ट -०४, पी.नाॅर्थ -०७, आर.साऊंथ - ०४, आर.मध्य ०१,आर.नाॅर्थ -०४, एल वाॅर्ड -१३, एम.ईस्ट -०५, टी विभाग -०२ असे एकूण ७७ असुरक्षित वस्त्या महानगरपालिकेच्या आपत्तकालीन विभागाकडून घोषित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT