मुंबई

अंतर्वस्त्रात लपवून आणले 19 कोटींचे सोने; 32 किलो सोन्याचे 98 तुकडे हस्तगत

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केनियाहून आलेल्या विमानातील दोन विदेशी महिलांनी अंतर्वस्त्रात लपवून आणलेले तब्बल 19 कोटी 15 लाख रुपयांचे 32 किलो 790 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.

केनियाची राजधानी नैरोबीहून येणार्‍या विमानातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त होताच सीमा शुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची सामानासह तपासणी सुरू केली होती. ही तपासणी सुरू असताना दोन विदेशी महिलांना या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी कपड्यासह सामानात सोने आणले होते.

या कारवाईत या अधिकार्‍यांनी 32 किलो 790 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेटचे गोल्ड मेल्टेड बारचे 98 तुकडे हस्तगत केले. काही सोने त्यांनी अंतर्वस्त्रात लपवून ठेवले होते. त्याची किंमत 19.15 कोटी रुपये आहे. या दोघींनाही नंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. सोने तस्करीसाठी त्यांना ठराविक रकमेचे कमिशनसह विमानाचे तिकीट देण्यात आले होते. सोने तस्करीप्रकरणी या दोन्ही महिलांना नंतर या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यांना ते सोने कोणी दिले आणि सोने ते कोणाला देणार होते याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT