मुंबई : पावसाळ्यात मुंबईत शॉर्टसर्किटच्या घटना नवीन नाहीत. मात्र, गेल्या अडीच महिन्यात तब्बल 1,450 पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. यात सर्वाधिक उपनगरांत 860 पेक्षा जास्त घटनांचा समावेश आहे. यामुळे हा चिंतेचा विषय झाला असून अग्निशमन दलानेही यावर उपाययोजनांची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, बेस्टच्या विद्युत विभागाकडूनही याची दखल घेतली असून पावसाळ्यानंतर तातडीने केबल बदलण्यासह अन्य कामे हाती घेण्यात येणार आहेत.
शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे शॉर्टसर्किटच्या घटना रोखणे आवश्यक आहे.मीटर बॉक्स मधील जुन्या केबल बदलून त्या ठिकाणी नवीन केबल टाकणे आवश्यक आहे. हे करत असताना मीटर बॉक्स केबिन कडून घरोघरी आर्थिंग गेली आहे की नाही, याचीही शानिशा होणे आवश्यक असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
जुन्या चाळींच्या विद्युत केबल योग्य रीतीने आहेत की नाही, याचा बेस्टच्या विद्युत विभागच्या सहकार्याने शोध घेण्यात येणार आहे. जेथे दोष आढळून येईल तेथे तातडीने केबल बदलण्यासह अन्य कामे करण्यात येणार आहेत. पावसाळ्यानंतर हा सर्वे करून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान पावसाळ्यात ठिकठिकाणी होणार्या शॉर्टसर्किटेकडे स्थानिक नागरिकांनी विशेष लक्ष द्यावे व शॉर्टसर्किट झाल्यास तातडीने त्याची माहिती 1916 या हेल्पलाइनवर आपत्कालीन कक्षाला कळविण्यात यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शॉर्टसर्किट कशामुळे
मुंबई शहरात जुन्या चाळी असून येथे विद्युत केबल दाटी-वटीने टाकण्यात आलेले आहेत.
अनेक केबल या उघड्यावर असून मीटर पासून जाणार्या केबलही जुन्या झाले आहेत.
मीटरमध्ये नागरिकांकडून करण्यात येणारी छेडछाड, केबल बदलण्याकडे होणारे दुर्लक्ष.