राजेश सावंत
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाचा प्रभाग ओबीसी महिला आरक्षणामध्ये गेल्यामुळे त्याच्या पुनर्वसनासाठी कोणत्या ना कोणत्यातरी माजी नगरसेवकाचा पत्ता कापला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नेमका पत्ता कोणाचा कापला जाणार यावरून माजी नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू आहे.
मुलुंड हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात असून 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये येथील सहाही प्रभागांमध्ये भाजपाचे नगरसेवक निवडून आले होते. यात 103 ते 108 प्रभागांचा समावेश आहे. यापैकी प्रभाग क्रमांक 108 मधून नील सोमय्या नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 मध्ये हा प्रभाग सर्वसामान्य होता. मात्र अलीकडेच झालेल्या प्रभाग आरक्षणांमध्ये हा प्रभाग ओबीसी महिला झाला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या मुलाचा पत्ता कापला गेला आहे. आरक्षणामध्ये मुलुंडमधील सहापैकी 104, 106, 107 हे तीन प्रभाग सर्वसामान्य झाले आहेत.
तर दोन ओबीसी महिला तर एक सर्वसामान्य महिलांसाठी आरक्षित झाला आहे. जनरल झालेल्या प्रभागांमध्ये 2017 मध्ये प्रकाश गंगाधरे, प्रभाकर शिंदे, समिता कांबळे निवडून आले होते. त्यामुळे यावेळी या प्रभागावर त्यांचा दावा राहणार आहे. प्रभाग क्रमांक 103 मधून मनोज कोटक निवडून आले होते. परंतु ते खासदार बनल्यामुळे या प्रभागावर भाजपातील अनेकांनी दावा केला आहे. परंतु प्रभाग आरक्षणामध्ये हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे येथून भाजपाला महिला उमेदवार द्यावा लागणार आहे. या प्रभागावर कोटक यांचा दावा असल्यामुळे कोटक यांच्या घरातील महिला किंवा त्यांच्या समर्थक कार्यकर्ता महिलेला हा प्रभाग जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर या प्रभागावर नील सोमय्याही दावा करू शकत नाही.
प्रभाग क्रमांक 105 मधून रजनी केणी निवडून आल्या होत्या. परंतु त्यांचा मृत्यू झाल्यामुळे हा प्रभाग रिक्त झाला आहे. 2017 मध्ये सर्वसामान्य महिला म्हणून आरक्षित असलेला हा प्रभाग आता ओबीसी महिला आरक्षण झाला आहे. त्यामुळे येथेही सोमय्या दावा करू शकणार नाहीत. त्यामुळे मुलुंडमधील सर्वसामान्यांसाठी खुल्या झालेल्या तीन प्रभागांवर सोमय्या दावा करू शकतात. किंबहुना तसा दावाही करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या प्रभागांतून पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी करणार्या प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, समिता कांबळे यापैकी कोणाचाही पत्ता कापला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमय्या हे भाजपातील ज्येष्ठ नेते असल्यामुळे आपल्या मुलासाठी ते आपली ताकद पक्षाकडे लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2017 मध्ये निवडून आलेल्या एका माजी नगरसेवकाचा राजकीय बळी जाऊ शकतो.