मुंबई, पुढारी वृत्तसेवा: सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याच्या रागातून मुंबईतील एका जावयाने आपल्या सासूला पेटवून देत तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ला जाळून घेत आपले जीवन संपविले. हा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरातील बाबू वाडी चाळ येथे घडला. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. (Mumbai Crime News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी मृत कृष्णा अटनकर (वय 59) आणि त्याची पत्नी वेगळे झाले होते. आणि त्याने यासाठी त्याची सासू बाबी दाजी उसरेला (वय 72) जबाबदार ठरवले होते. संसार मोडल्यानंतर कृष्णाची पत्नी मुलुंड येथील आपल्या आईच्या घरी राहायला गेली होती. ती आपल्या 20 वर्षांच्या मुलासोबत तिकडे राहत होती. आणि कृष्णा अनेकदा तिला भेटायला मुलुंडला जायचा यावरुन कृष्णा आणि बाबी उसरे यांच्यात वाद झाला होता. हा सर्व राग मनात ठेऊन त्यांने सासू च्या अंगावर पेट्रोल टाकून तिला ठार मारले. आणि त्यानंतर स्वतःला जाळून जीवन संपविले. (Mumbai Crime News)
पोलिसांना घटनास्थळी जळालेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळले. दार आतून बंद असल्याने पोलिसांना आत्महत्या असल्याचा संशय आला. मात्र, वृद्धेचा मृत्यू जाळण्यापूर्वी डोक्याला दुखापत झाल्याचे शवविच्छेदन अहवालात दिसून आले. नातेवाईकांचा जबाब आणि शवविच्छेदन विश्लेषणाच्या आधारे या प्रकरणात नंतर गुन्हा नोंदविण्यात आला.