भांडुप : मुलुंडमध्ये पालकांच्या आणि गॅरेज चालकाच्या निष्काळजीपणामुळे एक पाच वर्षाच्या मुलाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे.
कबीर अर्जुन कनोजिया असे या मृत्यू पावलेल्या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. तो मुलुंड नवघर येथील म्हाडा कॉलनी जवळ पूर्वद्रुतगती मार्गाला लागून असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी येथे कुटुंबासह राहत होता. त्याच्या वडिलांचे रस्त्याला लागून पानाची टपरी आहे. जिथे अनेक गॅरेज आहेत. गुरुवार दि ७ रोजी दुपारी हा मुलगा जवळील गॅरेजमध्ये खेळत होता. खेळता खेळता तो तिथेच उभ्या असलेल्या कारचा दरवाजा उघडून आत जाऊन बसला. गाडी आतून मात्र त्याला उघडता आली नाही आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला. या मुलाचे वडील समोरच्याच दुकानात होते. त्यांना मुलगा काही वेळाने दिसत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता उभ्या होंडा सिटी मोटार कारमध्ये कबीर निपचित पडलेला त्यांना दिसला. त्यानी तत्काळ त्याला बाहेर काढून पालिकेच्या सावरकर रुग्णालयात त्याला नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंबईत गाड्यांमध्ये अडकून लहान मुलांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनेत पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास नवघर पोलीस करीत आहे. पोलिसांनी पालकांना अशा घटना टाळण्यासाठी मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.