‌Muktabai Hospital News Pudhari
मुंबई

‌Muktabai Hospital News: ‘बेड नाही‌’ म्हणत गंभीर रुग्णाला दाखल करण्यास नकार! मुक्ताबाई रुग्णालयातील प्रकार

आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: घाटकोपरमधील मुंबई महानगरपालिकेच्या मुक्ताबाई रुग्णालयात एका गंभीर रुग्णाला ‌‘बेड उपलब्ध नाही‌’ या कारणावरून दाखल करून घेण्यास नकार देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ॲनिमिया झालेल्या रुग्णाला तातडीने रक्त चढवण्याची आवश्यकता असतानाही रुग्णालयाने प्रवेश नाकारला आहे.

विशेष म्हणजे, अद्याप पावसाळ्याला सुरुवातही झालेली नसताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेच्या मान्सूनपूर्व आरोग्य तयारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, मुक्ताबाई हे उपनगरातील महत्त्वाचे रुग्णालय असून काही विभाग वगळता रुग्णभार तुलनेने कमी असतो. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णाला दाखल न करणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गरज भासल्यास अतिरिक्त बेडची व्यवस्था किंवा इतर वॉर्डमध्ये समायोजन करणे शक्य असताना रुग्णाला परत पाठवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी किंवा महापालिका रुग्णालयांना केवळ बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत गंभीर रुग्णाला नाकारता येत नाही.

त्यामुळे या प्रकरणात महापालिका प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या संदर्भात मुक्ताबाई रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT