St Bus Pudhari File Photo
मुंबई

MSRTC Revenue: एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ; रक्षाबंधनदिनी तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री

रक्षाबंधनाच्या एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविल्यामुळे जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली.

एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक प्रवासी १०० किलोमीटर अंतरात प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक आगाराने आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवाशांची गरज ओळखून त्यानुसार वाहतूक नियोजन करणे आवश्यक आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांत याकडे लक्ष न देता लांब पल्ल्याच्या व तुलनेने अनुत्पादक फेऱ्यांवर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होऊन एसटीच्या तोट्यात भर पडत होती.

मागील महिन्यात उत्पन्नवाढीचा आढावा घेताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ऑगस्टपासून प्रत्येक आगाराने प्रवाशांची प्रत्यक्ष उपलब्धता व मागणी लक्षात घेऊन वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यास सुरुवात केली.

ग्रामीण व निमशहरी भागातील दररोज प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. आठवडी बाजार, यात्रा-जत्रा,च स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फेऱ्याही वाढविण्यात आल्या.

रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीचे विक्रमी उत्पन्न

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट रोजी एसटीला आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन उत्पन्न मिळाले. एका दिवसात ४५ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. विशेष म्हणजे एसटीच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.

सध्या एसटीला दररोज सरासरी ३४ ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत ३१ ऑगस्ट रोजी एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांची झेप घेत एसटीने विक्रमी उत्पन्न मिळवले. ऑगस्ट महिन्यात प्रथमच एसटीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्न मिळवले आहे.

प्रवाशांच्या गरजेनुसार सेवा हवी. प्रवासी उपलब्ध असलेल्या मार्गांवर अधिक फेऱ्या चालविणे, हेच उत्पन्नवाढीचे प्रभावी सूत्र आहे. ऑगस्टमधील ६६ कोटींची उत्पन्नवाढ ही योग्य दिशेने झालेल्या बदलाचे द्योतक आहे. भविष्यातही प्रवाशांच्या मागणीनुसार नियोजन केले तर एसटीला किमान तोटा होणार नाही.
- प्रताप सरनाईक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT