मुंबई : Shivneri Sundari | एसटी महामंडळाने गेल्या वर्षी मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरीमध्ये शिवनेरी सुंदरी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु हा निर्णय आता एसटी महामंडळाने गुंडाळला आहे.
शिवनेरी सुंदरीऐवजी उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या ग्रामीण भागातील प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भर दिला आहे. तिकीट दरातील सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची संख्या वाढल्याने त्यांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी मदतनीस (शिवनेरी सुंदरी) नेमण्याचा निर्णय महामंडळाने संचालक मंडळाच्या ३०४व्या बैठकीमध्ये घेतला होता. महत्वाचे म्हणजे तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना राबविण्यात येणार होती. महामंडळाच्या ताफ्यात सध्या ८७ ई-शिवनेरी आणि १०० शिवेनरी आहे. या बस दादर ते पुणे-स्वारगेट, ठाणे ते पुणे-स्वारगेट या मार्गावर धावतात. शिवनेरी सुंदरी योजनेत १५० महिला-पुरुष मदतनीसांची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यासाठी निविदा मागविण्यात येणार होती. महिला मदतनीस दिवसा, तर पुरुष मदतनीस रात्रीच्या प्रवासादरम्यान कार्यरत असणार होते. मदतनीसाला मराठी भाषेचे ज्ञान असण्याची अट होती. या योजनेकरिता महामंडळातर्फे आदरातिथ्य व्यवस्थापन संदर्भात काम करणाऱ्या संस्थाकडून खुल्या निविदा मागवण्यात येणार होत्या.
शिवनेरीची सेवा वाहकविरहित असल्यामुळे प्रवासादरम्यान डुलकी लागल्यामुळे गंतव्य ठिकाणी न उतरता प्रवाशांना पुढील थांब्यावर जाऊन उतरावे लागते. तसेच सहप्रवाशांकडून गुंगीचे औषध देऊन लुटण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मदतनीस म्हणून कोणीतरी असावे, असा विचार पुढे आला होता.